आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने 18 आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या 18व्या एशियन गेम्ससाठी पात्र ठरलेल्या 12 पुरुष आणि 9 महिला कबड्डी संघाची घोषणा केली आहे.
यावेळी पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये 12 पुरुष आणि 9 महिला संघ सहभागी होणार आहेत. आत्तापर्यंत 1990 पासून फक्त 7 पुरुषांचे संघ सहभागी होत होते. तसेच महिला संघांचा सहभाग 2010 पासून एशियन्स गेम्समध्ये करण्यात आला आहे.
तसेच आत्तापर्यंत भारतीय पुरुष संघ एशियन गेम्समध्ये अपराजीत राहिला आहे. त्यांनी 1990 ते 2014 पर्यंत खेळलेल्या सातही एशियन्स गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
त्याचबरोबर भारतीय महिला संघानेही 2010 आणि 2014 अशा दोन्ही एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवले आहे.
यावर्षीची एशियन गेम्स स्पर्धा इंडोनेशियामधील जकार्ता येथे 18 आॅगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. यात 19 आॅगस्ट ते 24 आॅगस्ट दरम्यान कबड्डीच्या स्पर्धा होतील.
यावर्षीही भारताच्या दोन्ही संघाना सुवर्णपदक राखण्याचे आव्हान असणार आहे.
एशियन गेम्स 2018 साठी निवड झालेल्या भारतीय पुरुष संघात गिरीश इरनाक आणि रिशांक देवाडिगा या महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंना तर 12 खेळाडूंच्या महिलांच्या संघात सायली केरीपाळे या महाराष्ट्राच्या एकमेव खेळाडूला संधी देण्यात आली आहे.
त्याचबरोबर रेल्वेकडून खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या सोनाली शिंगटेलाही भारतीय महिलांच्या संघात स्थान देण्यात आले आहे.
मात्र भारताच्या सुरजीत सिंग आणि सुरेंदर नाडा या महत्त्वाच्या खेळाडूंना संघात संधी न मिळाल्याने चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे.
एशियन गेम्ससाठी पात्र ठरलेले 12 पुरुष संघ:
भारत, इंडोनेशिया, इराण, इराक, जपान, कोरिया, मलेशिया, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, बांगलादेश
एशियन गेम्ससाठी पात्र ठरलेले 9 महिला संघ:
भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, इराण, जपान, कोरिया, श्रीलंका, थायलंड, तैवान.