17 फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे “शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार” वितरित करण्यात आले. कबड्डी विश्वात ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ स्थान असणाऱ्या महाराष्ट्राच्या अभिलाषा म्हात्रे यांना 2014-15 साठी ह्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या निमित्त त्यांची ही खास मुलाखत,
1999 पासून कबड्डी खेळताय इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल काय भावना आहेत ?
– 1999 पासून मी कबड्डी खेळत आहे. एवढे वर्ष खेळयानंतर माझे प्रशिक्षक,शुभचिंतक, सर्वांची इच्छा होती की हा पुरस्कार मला मिळावा. ते स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद होत आहे.
आपणाला याआधी “अर्जुन पुरस्कार” ही प्राप्त झाला आहे. तर कोणता पुरस्कार मिळाल्याबद्दल अधिक आनंद झाला अर्जुन की शिवछत्रपती ?
– हा प्रश्न असा झाला की तुम्हाला कोणता डोळा आवडतो. दोघांचीही तुलना नाही होऊ शकत. फक्त अर्जुन पुरस्कारावेळी निश्चित खात्री नव्हती. त्यामुळे तो जाहीर झाल्यानंतर अत्युच्च आनंद झाला. मात्र दोन्हीही पुरस्कार माझ्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत.
आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत प्रथमच तुम्हाला भारताचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. तो अनुभव कसा होता ?
– जेव्हा मला ही बातमी कळाली तेव्हा संपूर्ण भूतकाळ आठवला. आयुष्यात एक प्रसंग असा आला की पुन्हा कबड्डी खेळता येईल की नाही असे वाटले आणि आजचा दिवस की मला भारताचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली यापलीकडे काय असू शकते. महाराष्ट्राच्या खेळाडूला भारताचे कर्णधारपदाची संधी बऱ्याच वर्षांनंतर मिळाली. म्हणून ही माझ्यासाठी गौरवास्पद बाब आहे.
कबड्डीची सुरुवात कशी व कुठे झाली ?
– मी स्वामी मु्क्तानंद विद्यालयात शिकले. तिकडे माझ्या चेंबूर क्रीडा संघाचा सराव चालायचा. तिकडेच मी कबड्डी खेळायला सुरुवात केली.
कबड्डीकडे career म्हणून बघायला कधीपासून सुरुवात केली ?
– कबड्डीकडे career म्हणून किंवा job मिळवायची संधी म्हणून कधी बघितलेच नाही. आपली वेगळी ओळख निर्माण व्हावी तसेच आपल्या नावाने आपल्याला ओळखले जावे हीच एक गोष्ट मनात होती. आमचे सर आम्हाला नेहमी सांगायचे की महाराष्ट्राच्या संघाने राष्ट्रीय स्पर्धांत विजेतेपद मिळवणे ही कबड्डीमधील सर्वात मोठी कामगिरी आहे. त्यामुळे जेव्हापासून कबड्डी कळायला लागली तेव्हापासून महाराष्ट्राच्या संघात निवड होणे आणि त्यापलीकडे महाराष्ट्रला विजेतेपद मिळवून देणे हेच एक स्वप्न होते.
कबड्डीत दुखापती होण्याची भरपूर शक्यता असते त्यासाठी कोणती काळजी घेणे गरजेचे आहे खासकरून मुलींसाठी ?
– महाराष्ट्रातल्या कबड्डीत ‘क्लब संस्कृती’ आहे. कबड्डीचे भरपूर क्लब्स महाराष्ट्रात बघायला मिळतात. याउलट हरियाणा सारख्या राज्यांमध्ये कबड्डीच्या academy’sआहेत. त्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी चांगले प्रशिक्षण, प्रशिक्षक, व्यायामशाळा,आहार या सर्व गोष्टी उपलब्ध होतात. मात्र क्लबमध्ये या सर्व गोष्टी एकत्रित मिळत नाहीत म्हणून महाराष्ट्रातही अशा academy’s चालू व्हाव्यात जेणेकरून खेळाडू लवकर recover होऊ शकेल.
कबड्डी खेळताना कुटुंबाची साथ कशाप्रकारे लाभली ?
– मला जेव्हा पहिल्यांदा दुखापत झाली तेव्हा शस्त्रक्रिया करण्यासाठी जेवढ्या पैशांची गरज होती तेवढे पैसेही आमच्याजवळ नव्हते. माझ्या बाबांनी मोठया मेहनतीने त्यावेळी ते जमा केले. त्यानंतरही recovery साठी भरपूर खर्च येणार होता. मात्र बाबांनी कधीही माझ्या कबड्डीला विरोध केला नाही.
दुसऱ्यांदाही जेव्हा माझ्या पायाला दुखापत झाल्याने मला चालताही येत नव्हते तेव्हा मला बाबांनी अक्षरशः दिल्लीवरून उचलून घरी आणलेल. माझी आईही नेहमी माझ्या diet ची काळजी घेत असते. मी नवी मुंबईत राहते मात्र माझा सराव चेंबूरला असल्यामुळे कधी कधी रात्री घरी यायला उशीर व्हायचा तेव्हा काही लागले तर मी भावाला बोलावून घ्यायचे. त्यानेही कधीच कंटाळा केला नाही, नेहमी पाठिंबाच दिला. मी नेहमी सांगते जे पालक तुम्हाला पाठिंबा देतात त्यांचा विश्वास कधी तोडू नका आणि मोठे झाल्यानंतर त्यांना कधीही कमी लेखू नका कारण आज जे काही तुम्ही आहात ते त्यांनी केलेल्या त्यागामुळेच. मी मिळवलेल्या prize money मधून बाबांसाठी घर व कार घेतली. ते ही मोठ्या अभिमानाने सांगतात की मी माझ्या मुलीने घेतलेल्या घरात राहतो. घराच्या बाहेरही त्यांनी ‘अभिलाषा शशिकांत म्हात्रे’ आशीच पाटी लावली आहे.
तुमच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक चढ-उतार आलेत. प्रचंड यशही मिळालं आणि यशाच्या शिखरावर असताना दुखपतींमुळे कबड्डीपासून दूर ही राहावे लागले तर या यशापयाशाच्या प्रसंगांना कशाप्रकारे सामोरे गेलात?
– मी 2005 साली जेव्हा पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले तेव्हा मी पूर्ण सतरा वर्षांचीही नव्हते. त्यामुळे मी किती मोठं यश मिळवलंय याची मला फारशी कल्पना नव्हती. 2007 साली दुखापत झाली त्यातून सावरतच होते की 2008 साली अजून एक दुखापत झाली. मात्र मनात एकदाही कबड्डी सोडण्याचा विचार आला नाही. काहीही झाले तरी मला कबड्डी खेळायचीच होती. त्याकाळात भरपूर काही शिकायला मिळाले. लोकांचे खरे चेहरे कळाले. जे कालपर्यंत स्तुती करत होते ते आज अभिलाषा संपली वैगेरे म्हणत होते.
जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीवर मात करून यश मिळवता तेव्हा त्याची खरी किंमत कळते.
तुमच्या अप्रतिम पदललित्यसाठी तुम्ही ओळखले जातात. तर या अप्रतिम पदललित्याचे रहस्य काय आहे ?
– याचे क्रेडिट मी माझ्या सरांना देईन. त्यांनी माझ्याकडून मेहनत करून घेतली आणि मी ही त्यांनी ज्या गोष्टी शिकवल्या त्या आत्मसात करत गेले.
मैदानावर तुमचा शांत स्वभाव आणि खिळाडूवृत्ती ही वाखाणण्याजोगी आहेत ते गुण तुम्ही कसे आत्मसात केले ?
– खरतर ही गोष्ट माझ्याही कधी लक्षात आली नाही. कदाचित तो माझा स्वभाव असेल. आमच्या मैदानावर मोठे खेळाडू खेळायचे. मनिषा सावंत ह्या त्यातल्या माझ्या आवडत्या खेळाडू होत्या. मनिषा ताईचा स्वभावही शांत होता आणि त्या कधीच कोणाशी भांडल्या नाही. त्यामुळे तिच्याकडे पाहूनही मी हे सगळे शिकले असेन कदाचीत.
विविध स्तरांवर इतके वर्षे सातत्याने उत्कृष्ट खेळ करण्यासाठी ‘खेळातील वैविध्य’ फार महत्त्वाचे ठरते तर त्यावर कशी मेहनत घेतली ?
– जेव्हा मी खुल्या स्पर्धेत खेळायला सुरुवात केली तेव्हा मी अतिरिक्त खेळाडू म्हणून खेळायचे. मोक्याच्या क्षणी किंवा संघाला गरज असताना मी मैदानात उतरून गुण मिळवून द्यायचे. मात्र नंतर नंतर मी जेव्हा संघातील प्रमुख चढाईपटू बनले आणि संघाची सर्व जबाबदारी माझ्यावर आली तेव्हा अर्थातच प्रतिस्पर्धी संघ माझ्याविरूध्द रणनीती आखायचे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत चढांयामध्ये आणि एकूणच खेळामध्ये मला विविधता आणावी लागायची. मात्र त्याचे दडपण कधीही माझ्यावर आले नाही किंवा मी ते येऊ दिले नाही. कारण तसा सरावच सर माझ्याकडून करून घ्यायचे.
नवी मुंबई महानगरपालिकेत क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहात तर नोकरी आणि खेळ यात कसा ताळमेळ राखता ?
– प्रामाणिकपणे सांगायच तर, जेव्हा मला हि नोकरी ऑफर करण्यात आली तेव्हा माझे ध्येय कबड्डीत अजून काहितरी करून दाखवायच होत. मी पूर्णपणे कबड्डीला समर्पित होते आणि त्यामुळे मी तिकडे फारस लक्ष देऊ शकणार नव्हतेच. या सर्व गोष्टी मी पालकमंत्र्याना सांगितल्या तेव्हा त्यांनी त्या सर्व मान्य करून मला हे पद दिले. कबड्डीनंतर मात्र मी पूर्णपणे माझ्या अधिकारी म्हणून असलेल्या जबाबदारीला कटिबद्ध असेन.
कबड्डीमुळे तुमची अनेक स्वप्न पुर्ण झालीत मात्र असं एखाद स्वप्न जे अजुनही अपुर्ण आहे ?
– राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देण्याचे माझं स्वप्न अजूनही अपूर्ण आहे.
महिलांची स्वतंत्र कबड्डी लीग चालू होण्यासाठी ही योग्य वेळ आहे असे वाटते का ?
– भारतात सध्या भरपूर प्रतिभावंत महिला खेळाडू आहेत. रेल्वे, हरियाणा, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र या संघातील खेळाडू उत्कृ्ष्ट कामगिरी करत आहे. त्यामुळे त्यांची प्रतिभा जगासमोर येणे फार गरजेचे आहे. त्यामुळे नक्कीच महिलांची स्वतंत्र कबड्डी लीग चालू व्हावी.
कबड्डीतील ‘Youth Icon’ म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते तर कबड्डीत’Career’ करू इच्छिणाऱ्या नवोदित खेळाडूंना काय सांगाल
– पहिली गोष्ट म्हणजे पालकांना सांगेन की जर पाल्यांना कबड्डी आवडत नसेल तर ती त्यांच्यावर लादू नये. मात्र ज्यांना कबड्डी आवडत असेल त्यांनी नक्कीच मेहनत घेऊन त्याच्यामध्ये career करावे. कारण कबड्डीपटूचे भविष्य फारच उज्वल आहे यात शंकाच नाही.
सध्या अनेक खेळाडू ‘आत्मवृत्त’ लिहीत आहेत, तर तुमचा आत्मवृत्त लिहिण्याचा काही विचार ?
– माहीत नाही अजूनतरी तसा काही विचार नाही केला.
तुमचे आवडते कबड्डी खेळाडू
– मनिषा सावंत या माझ्या या माझ्या आवडत्या खेळाडू आहेत तसेच दिल्लीची पूजा शर्मा ही खेळाडूही मला आवडते. तर सध्या खेळत असलेल्या मध्ये पूजा ठाकूर, सोनाली शिंगटे या खेळाडू आवडतात.पुरुषांमध्ये अनूप कुमार, राकेश कुमार, शब्बीर बापू यांचा खेळ आवडतो.
कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण कोणता ?
– खरेतर असे खूप क्षण आहे मात्र त्यातील ’58व्या कबड्डी स्पर्धा उडपी 2011′ येथे मला ‘सर्वोत्कृष्ट चढाईपटू’ म्हणून पुरस्कृत करण्यात आले हा क्षण मी निवडेल. कारण त्याआधी झालेल्या दुखापतींवर मात करत आणि दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रियांनांतर मी पुनरागमन करत मी ती कामगिरी केली होती.त्यामुळे तो क्षण माझ्यासाठी नक्कीच खास होता.
तुमच्या चाहत्यांना काही संदेश ?
– ज्यांनी- ज्यांनी माझा खेळ बघुन माझ्यासाठी एकदा तरी टाळ्या वाजवल्यात, प्रार्थना केल्या त्या प्रत्येकाला मी धन्यवाद म्हणू इच्छिते. ते माझ्या खेळावर असेच प्रेम करत राहतील अशी अपेक्षा करते.
अभिलाषा म्हात्रे ह्या आम्हाला कबड्डीपटू म्हणून माहीत आहेत मात्र व्यक्तिगत आयुष्यात त्यांच्या इतर आवडीनिवडी काय आहेत हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल ?
– फावल्या वेळेत मला मुव्हीज बघायला आवडतात खासकरून ‘अनिमेटेड मुव्हीज’. शॉपिंग वगैरे करायला मला फारसं आवडत नाही त्यापेक्षा घरी आराम करणे मी पसंत करते. सकाळी लवकर उठायला मला अजिबात आवडत नाही;या गोष्टीवरून मी बऱ्याचदा बाबांचा ओरडाही खाते!
शब्दांकन: वैनतेय (शारंग ढोमसे)