विराट कोहली पंजाब विरुद्ध खराब फटका मारून आऊट झाल्यामुळे भारताचे महान फलंदाज आणि समालोचक सुनील गावसकर भलतेच नाराज झाले. त्यांनी याबद्दल कोहलीवर जोरदार टीका केली.
सलग ५ सामने हरलेल्या बेंगलोर जेव्हा पंजाब विरुद्ध खेळत होते तेव्हा कोहली अतिशय खराब शॉट खेळून संदीप शर्माच्या गोलंदाजीवर आऊट झाला. बेंगलोरची संपूर्ण टीम ११९ धावांवर आऊट झाल्यामुळे पंजाबला १९ धावांनी विजय मिळाला.
त्यावेळी सामन्यानंतर होणाऱ्या सोनी टीव्हीवरील कार्यक्रमात बोलताना गावसकर यांनी कोहलीच्या ह्या खेळीचा चांगलाच समाचार घेतला. गावसकर म्हणाले, ” तुमचा मुख्य फलंदाज(विराट कोहली ) संघाला सावरायचं सोडून आकर्षक फटकेबाजी करण्याच्या नादात आऊट झाला. षटकार आणि चौकारमध्ये २ धावांचा फरक आहे. परंतु तुम्ही जर हवेत फटके मारणार असाल तर रिस्क १००% जास्त असते. ”
“विराटने पहिली गोष्ट कोणती करावी तर स्वतःला आरशात पहावे. तो काय खेळतो आहे ते खरोखर बरोबर आहे का ते पहावे. त्याने पंजाब विरुद्ध खेळलेला शॉट नक्कीच खराब शॉट होता. तसेच त्याने त्याचीच पुनरावृत्ती कोलकाता विरुद्ध केली. ” असेही गावसकर पुढे म्हणाले.
सध्या विराटच्या पंजाब विरुद्ध मारलेल्या फटाक्याची जोरदार टर सोशल मीडियावर उडवली जात आहे.