आयपीएल २०१८ च्या मोसमासाठी खेळाडूंच्या होणाऱ्या लिलावाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएलचे हे ११ वे वर्ष असणार आहे. तसेच यावर्षीचा लिलाव मोठा असेल.
हा लिलाव बंगळुरूमध्ये २७ आणि २८ जानेवारी असे दोन दिवस होणार आहे. या बातमीला बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्टी दिली आहे. ते म्हणाले, “यावेळी अनेक कॅप खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असणार आहेत. हा मोठा लिलाव होणार असून २७ आणि २८ जानेवारीला बंगळुरूला होणार आहे. मागील सगळे लिलाव हे बंगळुरुलाच झाले आहेत. तसेच ती फ्रॅन्चायझींची निवड आहे.”
या वेळेस लिलावात फ्रॅन्चायझींच्या बजेट मध्ये ८० करोड पर्यंत वाढ झाली आहे. जे मागील वर्षी ६६ करोड होते. यावर्षी कोणताही संघ लिलावापूर्वी आणि लिलावात राइट टू मॅच वापरून जास्तीतजास्त ५ खेळाडू संघात कायम ठेवता येऊ शकतात.
बीसीसीआय यावेळेसच्या आयपीएल सामन्यांच्या वेळेत बदल करण्याची शक्यता आहे. ८ वाजता सुरु होणारे सामने ७ वाजता सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. पण अजून यासाठी स्टार इंडिया या प्रसारकांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
८ वाजता सुरु झालेले सामने मध्यरात्री पर्यंत चालतात. त्यामुळे स्टेडिअमवर सामने पाहायला आलेल्या प्रेक्षकांना समस्या येतात. तसेच लहानमुलेही यामुळे रात्रीपर्यंत टीव्ही पाहतात त्यामुळे त्यांच्या पालकांना त्याचा त्रास होतो.
आयपीएलच्या जनरल काऊंसिल बैठकीत आयपीएलचे अध्यक्ष्य राजीव शुक्ला यांनी सामन्यांच्या वेळेत बदल करण्याची कल्पना मांडली होती. या कल्पनेचे फ्रॅन्चायझींनी स्वागत केले आहे. पण आता हा बदल प्रसारकांच्या निर्णयांवर अवलंबून आहे.
याबद्दल शुक्ला म्हणाले ” हा फक्त एक विचार होता आणि त्याचे सर्वांनी स्वागत केले आहे. पण आम्हाला याविषयी प्रसारकांची बोलावे लागणार आहे. त्यांच्या निर्णयानुसार यावर मग काम चालू होईल. आयपीलचे सामने ज्या ठिकाणी होतात त्यातील बऱ्याच ठिकाणी प्रवास ही मोठी समस्या आहे. सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यात आलेली आहे. आम्ही सगळेच सामन्यांच्या वेळेत बदल करण्याचा विचार करतोय.”
याबरोबरच या बैठकीत आयपीएलच्या स्वरूपात युरोपिअन फुटबॉलप्रमाणे बदल करण्याविषयी देखील चर्चा झाली. युरोपिअन फुटबॉलप्रमाणे एखाद्या खेळाडूला स्पर्धेच्या मध्यवर्ती संघ बदलता येणार आहे. ज्या खेळाडूने सातपैकी दोनच सामने खेळले असतील तो दुसऱ्या संघात जाऊ शकतो.