बंगळुरू। रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात पार पडलेल्या सामन्यात बेंगलोरने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. बंगलोरच्या विजयात आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने अर्धशतकी खेळी करून महत्वाची कामगिरी बजावली.
दिल्लीने बेंगलोरसमोर 175 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगलोरचे सलामीवीर मनन वोहरा(2) आणि क्विंटॉन डिकॉकने(18) लवकर विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने संघाचा डाव सांभाळताना विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली.
खेळपट्टीवर स्थिर झाला असतानाच विराटने एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला पण बाउंड्री जवळ ट्रेंट बोल्टने त्याचा सुरेख झेल पकडला. विराटने 30 धावा केल्या.
यानंतर डिव्हिलियर्सला कोरे अँडरसन(15) आणि मंदीप सिंगने(17*) चांगली साथ दिली. विराट बाद झाल्यावर फलंदाजीची जबाबदारी घेत डिव्हिलियर्सने नाबाद अर्धशतक करत बेंगलोरला 18 षटकातच विजय मिळवून दिला. डिव्हिलियर्सने आज 5 षटकार आणि 10 चौकारांच्या साहाय्याने 39 चेंडूंतच नाबाद 90 धावा केल्या.
दिल्लीकडून ट्रेंट बोल्ट(1/33), ग्लेन मॅक्सवेल(१/13) आणि हर्षल पटेल (१/33) यांनी विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, दिल्लीकडून श्रेयश अय्यर(52) आणि रिषभ पंत(85) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. पण बाकी फलंदाजांना खास काही करता आले नाही. त्यामुळे दिल्लीला 20 षटकात 5 बाद 174 धावा करता आल्या.
दिल्लीच्या बाकी फलंदाजांमध्ये जेसन रॉय(5), गौतम गंभीर(3), ग्लेन मॅक्सवेल(4) आणि राहुल तेवतीया(13) यांनी धावा केल्या. तर बेंगलोरकडून युजवेंद्र चहल(2/22), उमेश यादव(1/27), कोरे अँडरसन(1/10) आणि वॉशिंग्टन सुंदर(1/31) यांनी विकेट्स घेतल्या.