जयपूर। राजस्थान रॉयल्सने सवाई मानसिंग स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात दिल्लीला १० धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता. त्यामुळे दिल्लीसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार ६ षटकात ७१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. त्यांच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर कॉलिन मुनरो धावबाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल(१७) आणि रिषभ पंतने(२०) थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनीही आपल्या विकेट खेळपट्टीवर स्थिर झाल्यावर गमावल्या.
यानंतर मात्र ख्रिस मॉरिसने(१७*) आक्रमक खेळण्याचा प्रयन्त केला पण तोपर्यंत धावगती खूप वाढली होती. त्यामुळे दिल्लीला विजयापासून दूर राहावे लागले.
राजस्थानकडून बेन लाफ्लिन(२/२०) आणि जयदेव उनाडकट(१/२४) यांनी विकेट घेत दिल्लीला ५ बाद ६० धावांवर रोखले.
तत्पूर्वी पाऊस सुरु झाल्याने राजस्थानची फलंदाजी १७.५ षटकानंतर थांबवण्यात आली होती. पावसाला सुरुवात झाली तेव्हा राजस्थान १७.५ षटकात ५ बाद १५३ धावांवर होते.
राजस्थाकडून कर्णधार अजिंक्य राहणे(४५), संजू सॅमसन (३७)आणि जॉस बटलरने(२९) चांगली लढत दिली. पाऊस सुरु झाला तेव्हा राजस्थानकडून राहुल त्रिपाठी(१५*) आणि कृष्णप्पा(२*) गॉथम फलंदाजी करत होते.
राजस्थानच्या बाकी फलंदाजांपैकी डोर्सी शॉर्ट(६) आणि बेन स्टोक्स(१६) यांनी धावा केल्या. दिल्लीकडून शहाबाज नदीम(२/३४), ट्रेंट बोल्ट(१/२६) आणि मोहम्मद शमी(१/२९) यांनी विकेट घेतल्या.