इंडियन प्रीमियर लीगचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून यूएई मध्ये सुरू होणार आहे. सर्व संघ त्याच्या तयारीत व्यस्त आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ देखील या स्पर्धेसाठी जोरदार तयारी करत आहे. आरसीबीने एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही आणि यावेळी आयपीएल चषकावर नाव कोरण्याची त्यांना नक्कीच इच्छा असेल.
यंदा आरसीबीने लिलावातील अनेक सर्वोत्कृष्ट खेळाडू विकत घेतले आहेत आणि बऱ्याच चांगल्या परदेशी खेळाडूंना संघात घेतले आहे. आयपीएलच्या या हंगामात हे खेळाडू आरसीबीसाठी खूप प्रभावी ठरू शकतात. आयपीएलमधील कोणत्याही संघासाठी परदेशी खेळाडूंची भूमिका खूप महत्वाची आहे. जर परदेशी खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली तर संघाला संतुलन राखणे सोपे जाईल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा संघ आतापर्यंत विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सवर अवलंबून असलेला दिसत होता. या दोघांव्यतिरिक्त सामना जिंकून देणारा दुसरा खेळाडू दिसला नाही. परंतु या हंगामात आरसीबीचे काही परदेशी खेळाडू आहेत जे संघाच्या विजयात प्रभावी आणि महत्वाची भूमिका बजावू शकतात.
या लेखात आरसीबीच्या ३ नवीन परदेशी खेळाडूंबद्दल जाणून घेऊ जे या मोसमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात आणि पहिल्यांदा आयपीएल विजेता होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात.
३. जोश फिलिप (Josh Philip)
यंदा आयपीएलच्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज जोश फिलिपचा समावेश आरसीबीने त्यांच्या संघात केला आहे. या हंगामात तो आरसीबीसाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो. तो एक उत्तम फलंदाज आहे आणि तो संघासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.
२०१९ च्या बिग बॅश लीगमध्ये जोश फिलिपने जबरदस्त कामगिरी केली. त्याने सुमारे १३० च्या स्ट्राइक रेटने ४८७ धावा केल्या होत्या. सिडनी सिक्सर्सच्या अंतिम सामन्यात त्याने २९ चेंडूत अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याला सामनावीर म्हणूनही निवडले गेले. त्याची अशी कामगिरी पाहता तो आरसीबीसाठीही मॅच विनर ठरू शकतो.
२. क्रिस मॉरिस (Chris Morris)
यंदा आयपीएल हंगामाच्या लिलावात आरसीबीने ख्रिस मॉरिसला १० कोटींच्या प्रचंड रकमेवर विकत घेतले. ख्रिस मॉरिस गोलंदाजी व्यतिरिक्त जबरदस्त फलंदाजीही करू शकतो. तो अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली भूमिका बजावू शकतो.
ख्रिस मॉरिसकडे आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. मागील हंगामात तो दिल्ली कॅपीटल्स संघात होता. आरसीबीसाठी या मोसमात त्याची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे.
१. अॅरोन फिंच (Aaron Finch)
ऑस्ट्रेलियाचा वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार अॅरोन फिंच हादेखील या आयपीएल हंगामात आरसीबीच्या संघाचा एक भाग आहे. फिंच हा मर्यादित षटकांचा एक जबरदस्त खेळाडू आहे आणि सलामीवीर म्हणून संघाला वेगवान सुरुवात करून देण्यासाठी ओळखला जातो. सामना एक हाती फिरवण्याची क्षमता त्याच्यात आहे.
ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार अॅरॉन फिंच संघात आल्यामुळे आरसीबी कर्णधार विराट कोहलीला मोठा फायदा होईल. फिंचचा कर्णधारपदाचा अनुभव कोहलीसाठीही उपयुक्त ठरेल.