नवी दिल्ली। जगभरातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी२० लीग आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन यावर्षी १९ सप्टेंबरपासून यूएईत होणार आहे. त्यासाठी सर्व भारतीय खेळाडू यूएईला रवाना झाले आहेत. त्यानंतर आता आयपीएल २०२० मध्ये भाग घेणारे परदेशी खेळाडूंचेही यूएईत आगमन सुरू झाले आहे. यामध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे ३ दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही शनिवारी (२२ ऑगस्ट) यूएईला पोहोचले आहेत. विराटबरोबरच आरसीबी संघही शुक्रवारी दुबईला पोहोचला होता.
आयपीएलसाठी दक्षिण आफ्रिकेचे जे ३ खेळाडू दुबईत पोहोचले आहेत, त्यांमध्ये दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स, वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि ख्रिस मॉरिस यांचा समावेश आहे. आरसीबीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत पुष्टी केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत लिहिले, “आरसीबी चाहत्यांनो तुम्ही ज्यांची वाट पाहत होता, ते खेळाडू आले आहेत. एबी डिविलियर्स, डेल स्टेन, ख्रिस मॉरिससोबत दुबईमध्ये सामील झाले आहेत.”
आयपीएल २०२० च्या आयोजनापूर्वी आरसीबी संघ २१ ऑगस्टला दुबईत पोहोचला होता. आरसीबी संघ आता माईक हेसन आणि सायमन कॅटिच यांच्यासोबत मिळून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर २९ ऑगस्टपासून ३ आठवड्यांचे शिबिर सुरू करणार आहेत. तरीही, यापूर्वी सर्व खेळाडूंना ६-६ दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावं लागणार आहे आणि यादरम्यान त्यांच्या प्रत्येकी ३ कोरोना चाचण्या होणार आहेत.
And here it is RCB fans, the moment you’ve all been waiting for! 🤩@ABdeVilliers17, @DaleSteyn62 and @Tipo_Morris have joined the team in Dubai! 😎#PlayBold #TravelDay #IPL2020 pic.twitter.com/l0n09ZV5Jb
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) August 22, 2020
ट्विटरवर शेअर करण्यात व्हिडिओत डिविलियर्स म्हणत आहे की, “मी खूप उत्सुक आहे. मला इथे येऊन खुप आनंद होत आहे. हा प्रवास सामान्य प्रवासापेक्षा थोडा वेगळा होता. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या मित्रांसोबत हा प्रवास खास बनविला. आम्ही आरसीबी कुटुंबात परत आल्यामुळे खूप खुश आहोत, सोबतच या वर्षाची वाट पाहत आहोत. बॅग पॅक करा आणि या वर्षासाठी आपण काय करीत आहात यासाठी ऊर्जा मिळवा. नवीन खेळाडूंना भेटून मी उत्साहित आहे.”