इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सुरुवातीच्या काही सामन्यात जबरदस्त कामगिरी केली होती. 10 सामन्यांपैकी 7 सामन्यात या संघाने विजय मिळवला होता. मात्र, मागील तीनही सामन्यात या संघाचा पराभव झाला आहे. शनिवारी (31 ऑक्टोबर) हैदराबाद विरुद्ध झालेल्या पराभवानंतर आरसीबीचा दिग्गज फलंदाज एबी डिविलिअर्स याला संघ पुनरागमन करेल असा विश्वास आहे.
संघात पुनरागमन करण्याची क्षमता
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर बोलताना एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, “आमच्या संघात पुनरागमन करण्याची पूर्ण क्षमता आहे. सलग 3 सामने गमावणे ही अत्यंत खराब कामगिरी आहे. हे स्पर्धेचे स्वरूप आहे आणि येथे काहीही घडू शकते. जर तुम्ही सलग 3 सामने गमावले, तर सलग 3 सामने जिंकूही शकता. आगामी सामन्यांसाठी आमचा हाच विचार आहे.”
हैदराबादच्या गोलंदाजांचे केले कौतुक
हैदराबादच्या गोलंदाजीविषयी बोलताना डिविलियर्स म्हणाला की, “जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या हैदराबादच्या गोलंदाजांना विजयाचे श्रेय दिले पाहिजे. त्यांनी आम्हाला चौकार षटकार मारण्याची फारशी संधी दिली नाही. वेगवान गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये चांगली कामगिरी केली. त्यांनी कोणतीही चूक केली नाही. त्यामुळे पॉवरप्लेमध्ये आम्हाला अधिक धावा करता आल्या नाही. रशिद खान उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध धावा करणे सोपे नाही.”
हैदराबादने मिळवला विजय
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा शारजाहमध्ये पाच गडी राखून पराभव केला. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत 120 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल सनरायझर्स हैदराबादने 15 व्या षटकातच 5 गडी गमावून विजयी मिळवला.
प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे अवघड
आरसीबीला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी इतर संघांच्या विजय अथवा पराभवावर अवलंबून राहावे लागेल. पुढील सामन्यात ते कशी कामगिरी करतात हे पाहावं लागेल.