मुंबई । चेन्नई सुपर किंग्जचे 11 सदस्य आणि दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर संपूर्ण टीमला क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. चेन्नई सुपर किंग्जनंतर आता दिल्ली कॅपिटल्सला कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.
रविवारी संध्याकाळी, दिल्ली कॅपिटल्स संघाचे सहाय्यक फिजिओथेरपिस्टला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. सध्या त्यांना अलग ठेवण्यात आले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने त्यांच्या स्टाफमधील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती रविवारी दिली.
फ्रेंचायझीने सांगितले की, ‘तपासणीत पहिल्या दोन टेस्ट निगेटिव्ह आल्या, परंतु जेव्हा तिसर्यांदा चाचणी घेण्यात आली तेव्हा अहवाल पॉझिटिव्ह आला.’
टीमचे सहाय्यक फिजिओथेरपिस्ट अद्याप टीमच्या खेळाडूंना भेटले नाहीत, अशी माहितीही फ्रँचायझीने दिली. याचा अर्थ असा की ते अद्याप कोणत्याही खेळाडू किंवा सहाय्यक कर्मचार्यांच्या संपर्कात आलेले नाहीत.
बीसीसीआयने हे स्पष्ट केले की, यूएईत आलेल्या संघातील खेळाडू आणि क्रीडा कर्मचारी यांच्यासह एकूण 1988 लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. दोन खेळाडूंसह चेन्नई सुपर किंग्जचे 13 सदस्य पॉझिटिव्ह आढळले तेव्हा संघांमध्ये खळबळ उडाली होती.