---Advertisement---

IPL २०२० : मुंबईच्या गोलंदाजांचा टिच्चून मारा; मुंबईचा पंजाबवर ४८ धावांनी दणदणीत विजय

On: गुरूवार, ऑक्टोबर 1, 2020 11:37 PM
---Advertisement---

आयपीएलच्या १३ व्या हंगामातील तेरावा सामना गुरुवारी (१ ऑक्टोबर) दुबई येथे किंग्स इलेव्हन विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. हा सामना मुंबई इंडियन्सने ४८ धावांनी जिंकला. मुंबईच्या विजयात कर्णधार रोहित शर्मा, कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्याने मोलाचे योगदान दिले. पोलार्डला त्याच्या कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. हा मुंबईचा या हंगामातील दुसरा विजय होता.

नाणेफेक जिंकत पंजाब संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. आणि मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने ४ विकेट्स गमावत १९१ धावा केल्या. मुंबईने दिलेल्या १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने ८ विकेट्स गमावत १४३ धावाच केल्या.

पंजाब संघाकडून फलंदाजी करताना निकोलस पूरनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २७ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ४४ धावा कुटल्या. सोबतच मयंक अगरवालने (२५) आणि कृष्णपा गॉथमने (२२) धावा केल्या. याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा आकडाही पार करता आला नाही. कर्णधार केएल राहुललाही अवघ्या १७ धावांवर समाधान मानावे लागले.

मुंबईकडून गोलंदाजी करताना जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह आणि राहुल चाहर या गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्यांच्याव्यतिरिक्त ट्रेंट बोल्ट आणि कृणाल पंड्याने प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाकडून कर्णधार रोहित शर्माने ४५ चेंडूत सर्वाधिक ७० धावा कुटल्या. या धावा करताना त्याने ३ षटकार आणि ८ चौकार ठोकले. सोबतच कायरन पोलार्डने (४७) आणि हार्दिक पंड्याने (३०) धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त मागील सामन्यात ९९ धावा कुटणाऱ्या इशान किशनला २८ धावांवर समाधान मानावे लागले, तर सूर्यकुमार यादव (१०) व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या करता आली नाही.

पंजाबकडून गोलंदाजी करताना शेल्डन कॉट्रेल, मोहम्मद शमी आणि कृष्णप्पा गॉथमने प्रत्येकी १ विकेट घेतली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---