दरवर्षी प्रमाणेच, या वर्षीही मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. अंतिम अकरात खेळणाऱ्या खेळाडूंव्यतिरिक्त मुंबई इंडियन्सची बेंच स्ट्रेंथही मजबूत आहे. यावेळच्या, आयपीएल लिलावापूर्वी, काही खेळाडूंना मुंबई इंडियन्सच्या संघाने करारमुक्त केले होते. त्यानंतर, काही नवीन खेळाडूंना पहिल्यांदा मुंबई इंडियन्स संघात समाविष्ट करण्यात आले.
चार वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबईने २०२० आयपीएल लिलावाआधी जे खेळाडू सोडले होते, त्यातील काही खेळाडूंची उणीव संघाला भासू शकते. कारण, त्यातील काही खेळाडूंची जागा भरून काढण्यासाठी आवश्यक खेळाडू मुंबईकडे नाहीत.
१) मयंक मार्कंडे
२०१८ मध्ये पहिल्यांदा मुंबई इंडियन्सकडून खेळताना मयंक मार्कंडेने प्रभावी कामगिरी केली होती. त्याला करारमुक्त केल्याने मुंबई इंडियन्सला मोठा तोटा होऊ शकतो. युएईमधील खेळपट्ट्यांवर फिरकीपटू यशस्वी ठरलेले आपण पाहतो.
राहुल चहरशिवाय, मुंबईकडे दुसरा चांगला लेगस्पिनर नाही. त्यामुळे मुंबईकडे फिरकीच्या मोर्चावर जयंत यादव व अनुकुल रॉय व्यतिरिक्त चांगले पर्याय नाहीत.
२) बेन कटिंग
दोन वर्ष मुंबईकडून खेळल्यानंतर बेन कटिंगला मुंबईने करारातून मुक्त केले होते. २०१८ च्या हंगामात कटिंग यशस्वी ठरला होता मात्र, २०१९ ला तो तितकी चांगली कामगिरी करू शकला नाही.
मुंबईकडे कायरन पोलार्ड व्यतिरिक्त दुसरा ताकदवान विदेशी अष्टपैलू नाही. युवा शेरफान रुदरफोर्ड मुंबई संघात आला असला तरी, त्याच्याकडून कटिंग सारख्या अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा बाळगू शकत नाही. कटिंग स्फोटक फलंदाजी, मध्यमगती गोलंदाजी व चपळ क्षेत्ररक्षण करू शकतो.
३) सिद्धेश लाड
मुंबईच्या संघात एकाहून एक सरस फलंदाज असले तरी सिद्धेश लाडसारख्या फलंदाजाला संघातून दूर करणे मुंबईला महागात पडू शकते. फलंदाजी सोबतच तो वेळप्रसंगी आपल्या ऑफस्पिनने बळी देखिल मिळवू शकतो.
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व ईशान किशन यांच्या व्यतिरिक्त विश्वासू असा भारतीय फलंदाज मुंबईच्या संघात नाही. त्यामुळे, सिद्धेशची उणीव मुंबईला भासू शकते. आयपीएल लिलावआधी, मुंबईने सिद्धेशला कोलकाता नाइट रायडर्सशी ट्रेड केले होते.