गुरुवारी (२२ ऑक्टोबर) दुबई येथे आयपीएल २०२०च्या ४० व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्सला ८ विकेट्सने पराभवाचं पाणी पाजलं. हा हैदराबादचा या हंगामातील चौथा विजय होता. हैदराबादच्या या विजयाचा हीरो मनीष पांडे ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
नाणेफेक जिंकून हैदराबाद संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि राजस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १५४ धावा केल्या होत्या. या धावांचे आव्हान हैदराबाद संघाने १८.१ षटकात केवळ २ विकेट्स गमावत १५६ धावा करत पूर्ण केले.
हैदराबाद संघाकडून फलंदाजी करताना मनीष पांडेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४७ चेंडूत ८३ धावांची तडाखेबंद अर्धशतकी खेळी केली. यामध्ये ४ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. त्याच्यासोबतच विजय शंकरनेही ५१ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त केवळ जॉनी बेयरस्टोने १० धावा केल्या, तर कर्णधार डेविड वॉर्नर केवळ ४ धावा करत बाद झाला.
राजस्थानकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनेच २ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २६ चेंडूंचा सामना करताना ३६ धावा केल्या. यामध्ये १ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. त्याच्यासोबतच अष्टपैलू बेन स्टोक्सने ३० धावांची खेळी केली. इतर फलंदाज तर २० धावांच्या आतच तंबूत परतले.
हैदराबादकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज जेसन होल्डरने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकांत ३३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. सोबतच विजय शंकर आणि राशिद खान या गोलंदाजांनीही प्रत्येकी एक विकेट आपल्या खिशात घातली.
या विजयासह हैदराबादला २ गुण मिळाले. याचा फायदा घेत हैदराबाद संघ ८ गुणांसोबत गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर विराजमान झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
-विक्रमवीर पांडे! हैदराबादविरुद्ध अर्धशतक ठोकत मनीषने केला ‘खास’ विक्रम, वाचा सविस्तर
-हैदराबाद सनरायझर्सच्या ‘या’ निर्णयाने आयपीएलच्या १३ व्या हंगामातील परंपराच मोडली
-…आणि ‘असा’ निर्णय घेणारा सनरायझर्स हैदराबाद ठरला पहिलाच संघ
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज
-आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज
-आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज