आयपीएल २०२० चा मोसम सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. यादरम्यान प्रेक्षकाव्यतिरिक्त हा आयपीएल मोसम आयोजन करण्याचीही चर्चा झाली होती. परंतू आता आयपीएलचे आयोजन करायचे म्हटले तरी कोणत्या देशाचे खेळाडू उपलब्ध होऊ शकतात कोणते नाही, या सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे.
तसेच जरी परदेशी खेळाडूंशिवाय आयपीएलचे आयोजन करण्याचा निर्णय झाला तरी अनेक गोष्टीचांही विचार करावा लागेल. तसेच जर असे झाले तर प्रत्येक संघाला परदेशी खेळाडूंशिवाय फक्त भारतीय खेळाडूंसह ११ जणांचा संघ तयार करण्याचे आव्हान असेल.
जर असा विचार करायचा झाला तर आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचा असा असू शकतो परदेशी खेळाडूंव्यतिरिक्त ड्रिम ११ संघ –
सलामीवीर- रोहित शर्मा (कर्णधार) आणि इशान किशन (यष्टीरक्षक)
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मागील अनेक वर्षापासून सलामीला फलंदाजी करत आहे. तसेच त्याने आयपीएलमध्येही सलामीला फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. त्याची सलामीला फलंदाजी करताची कामगिरी शानदार आहे. त्यामुळे मुंबईकडे तो सलामीला फलंदाजीसाठी चांगला पर्याय आहे. रोहितने आयपीएलमध्ये १८८ सामन्यात ४८९८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.
रोहितला सलमीला युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन साथ देऊ शकतो. इशान मागील काही मोसमांपासून मुंबईकडून खेळत आहे. त्याने मुंबईकडून खेळताना २१ सामने खेळले असून ३७६ धावा केल्या आहेत. तसेच तो मुंबईकडून यष्टीक्षणाची जबाबदारीही सांभाळू शकतो. त्याने मुंबईकडून खेळताना यष्टीमागे ११ विकेट्सही घेतल्या आहेेत.
मधली फळी – सुर्यकुमार यादव आणि सौरभ तिवारी
सुर्यकुमार यादवने मागील काही काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये तसेच भारत अ संघाकडून खेळताना शानदार कामगिरी केली आहे. मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी मुंबईकडे सुर्यकुमारच्या रुपात दमदार पर्याय आहे. त्याने आत्तापर्यंत मुंबईकडून ३३ सामने खेळले असून यात त्याने३३.८९ च्या सरासरीने ९८३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ६ अर्धशतकांचा समावेश आहे.
सुर्यकुमार बरोबरच मुंबईकडे सौरभ तिवारी हा देखील एक चांगला पर्याय आहे. तिवारी २०१७ नंतर आयपीएल खेळला नसला तरी त्याला मुंबईकडून याआधी खेळण्याचा अनुभव आहे. त्याचा आयपीएलमधील पहिला संघही मुंबईच आहे. त्याने मुंबईकडून २७ सामने खेळले आहेत. यात ४ अर्धशतकांसह त्याने ५९२ धावा केल्या आहेत.
अष्टपैलू – हार्दिक आणि कृणाल पंड्या
हार्दिक आणि कृणाल हे पंड्या बंधू मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचे भाग असून ते दोघेही गोलंदाजी आणि फलंदाजीही करत असल्याने मुंबईला संघात समतोल साधता येतो. तसेच त्या दोघांकडेही आक्रमक खेळण्याची क्षमता आहे.
हार्दिकने २०१५ पासून मुंबईकडून खेळताना ६६ सामन्यात १०६८ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ४२ विकेट्स घेतल्या आहेत. तर त्याचा मोठा भाऊ कृणालने २०१६ पासून मुंबईकडून ५५ सामने खेळले असून ८९१ धावा केल्या आहेत. तसेच ४० विकेट्स घेतल्या आहेत.
गोलंदाजी – अनुकुल रॉय, राहुल चाहर, धवल कुलकर्णी, मोहसिन खान, जसप्रीत बुमराह
मुंबईकडे भारतीय गोलंदाजांची चांगली फळी आहे. त्यांच्याकडे जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी हे अनुभवी गोलंदाज आहेत. तर राहुल चाहर, मोहसिन खान आणि अनुकुल रॉय हे युवा गोलंदाज आहेत.
धवल कुलकर्णीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ९० सामने खेळले असून ८६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच बुमराह हा तर मुंबईच्या गोलंदाजी फळीतील मुख्य अस्त्र आहे. त्याने मुंबईकडून २०१३ पासून खेळताना ८० सामन्यात ८५ विकेट्स घेतल्या आहेत.
याबरोबच २१ वर्षीय अनुकुल रॉयला आत्तापर्यंत केवळ १ आयपीएल सामना खेळायला मिळाला असला तरी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येे झारखंडकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्याने आत्तापर्यंत ट्वेंटी२० प्रकाराचे एकूण २१ सामने खेळले आहेत. राहुल चाहर हा मुंबई संघातील मागील मोसमात नियमित सदस्य राहिला आहे. तसेच त्याची कामगिरीही चांगली आहे. त्याने १३ सामने खेळताना १३ विकेट्स घेतल्या आहेत.
त्याचबरोबच मोहसिन खानला जरी अजून आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसली तरी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश कडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्याने ट्वेंटी२० प्रकाराचे २० सामने आत्तापर्यंत खेळले असून २६ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख –
जाणून घ्या ११९२ सालापासून क्षेत्ररक्षणात झालेले मोठे बदल
वनडे क्रिकेटमध्ये आजपर्यत चेंडूंमध्ये झालेले बदल
गेल्या ५ वर्षात रोहित शर्माने मारलेत एवढे षटकार !