इंडियन प्रीमियर लीग 2020 चा प्रवास आता संपला आहे. कोरोनामुळे यंदा आयपीएल युएईमध्ये अनेक चढ-उतारांसह खेळली गेली. दरवर्षी आयपीएल स्पर्धा मार्च ते मे यादरम्यान होत असते. यावेळी महाभयंकर साथीच्या रोगामुळे आयपीएल 2020 चे आयोजन सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान बायो- बबल वातावरणात करण्यात आले होते. खेळाडू आणि इतर कर्मचारी जवळजवळ दोन महिने त्यांच्या कुटुंबापासून आणि बाह्य जगापासून विभक्त बायो बबलमध्ये राहत होते आणि त्यांनी या स्पर्धेला यशस्वी केले. यश आणि अपयशाचे साक्षीदार असलेल्या या स्पर्धेत बरेच नवीन चेहरे उदयास आले आणि बरेच मोठे चेहरे अयशस्वी ठरले. या हंगामात अपयशी ठरलेल्या 5 खेळाडूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
आयपीएल 2020 मधील सर्वात अपयशी पाच खेळाडू :
1. केदार जाधव (चेन्नई सुपर किंग्ज)
केदार जाधव आयपीएलचा 13 वा हंगाम विसरू इच्छित असणार. या हंगामात केदारने चेन्नई सुपर किंग्जला खूप निराश केले. 8 सामन्यात त्याने 20.66 च्या सरासरीने आणि 93.93 च्या स्ट्राईक रेटने केवळ 62 धावा केल्या. त्याने कोणत्याही डावात 30 धावांचा टप्पा ओलांडला नाही. या हंगामात त्याची सर्वाधिक धावसंख्या फक्त 26 धावा आहे. फलंदाजीच्या खराब कामगिरीनंतर, चेन्नई पुढील हंगामात त्याला संघात स्थान देते की नाही, हे आता येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
2. दिनेश कार्तिक (कोलकाता नाईट रायडर्स)
कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार दिनेश कार्तिकही अयशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. या हंगामात फलंदाजी करताना त्याने 14.08 च्या सरासरीने आणि 126.11 च्या स्ट्राइक रेटने 169 धावा केल्या. 14 डावांमध्ये त्याने फक्त एक अर्धशतक झळकावले आहे, तर तीन वेळा तो शून्यावर बाद झाला.
तामिळनाडूच्या या क्रिकेटपटूने हंगामाच्या मध्यावरच कर्णधारपद सोडले. कर्णधारपद सोडल्यानंतर इंग्लंडच्या ऑयन मॉर्गनला कर्णधारपद सोपविण्यात आले. आयपीएलचा 14 वा हंगाम आता फक्त चार ते पाच महिने दूर आहे. अशा परिस्थितीत कार्तिक पुढच्या हंगामात धावा करण्याचा नक्की प्रयत्न करणार.
3. शिमरॉन हेटमायर (दिल्ली कॅपिटल्स)
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हेटमायरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. कोणत्याही गोलंदाजाला घाम फोडण्याची शक्ती त्याच्याकडे आहे. तो आता अवघ्या 23 वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने अनेक वेळा स्वत: ला सिद्ध केले आहे. पण आयपीएलच्या या हंगामात दिल्ली संघातून खेळताना तो 12 सामन्यांत केवळ 185 धावा करू शकला. त्याची सरासरी 23.12 आणि स्ट्राइक रेट 148 आहे. संपूर्ण स्पर्धेत त्याला एकही अर्धशतक करता आले नाही.
4. ग्लेन मॅक्सवेल (किंग्ज इलेव्हन पंजाब)
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला या हंगामातील सर्वात अपयशी खेळाडू म्हणता येईल. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणार्या मॅक्सवेलने 13 सामन्यात 15.62 च्या सरासरीने आणि 101.88 च्या स्ट्राईक रेटने केवळ 108 धावा केल्या आहेत. संपूर्ण स्पर्धेत तो एकदाच 30 चा आकडा पार करू शकला. त्याची सर्वाधिक धावसंख्या 32 धावा होती. पंजाबने त्याला लिलावात 10.75 कोटींमध्ये विकत घेतले होते. परंतु त्याने त्याप्रमाणे अजिबात खेळ दाखवला नाही.
5. एमएस धोनी (चेन्नई सुपर किंग्ज)
विश्वचषक 2019 नंतर 14 महिने क्रिकेटपासून दूर राहिलेला अनुभवी क्रिकेटपटू एमएस धोनी आयपीएल 2020च्या संपूर्ण स्पर्धेत फारच अपयशी ठरला. त्याने 14 सामन्यात फक्त 200 धावा केल्या. त्याची सरासरी धावसंख्या 25 आणि स्ट्राइक रेट 116.27 आहे. कर्णधार म्हणूनही धोनी संघाला बळ देऊ शकला नाही. तीन वेळचा आयपीएल विजेता संघ चेन्नई सुपर किंग्जने स्पर्धेचा शेवट सातव्या क्रमांकावर केला. धोनी आयपीएलमधून निवृत्त होत नसल्यामुळे त्याचे चाहते मात्र निर्धास्त होऊ शकतात. 2021 मध्ये तो पुन्हा पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार आहे.
ट्रेंडिंग लेख-
-मुंबईचे ५ पांडव! संघाला चॅम्पियन बनवण्यात ‘या’ पाच खेळाडूंनी निभावली मोलाची कामगिरी
-गोलंदाजीचे शेर! आयपीएलच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारे ३ गोलंदाज