नवी दिल्ली। आयपीएल २०२० मधील २१ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या सामन्यात पहिल्यांदा धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. चेन्नई संघासाठी आव्हान फार मोठे नव्हते. परंतु तरीही त्यांना पराभव पत्करावा लागला.
वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लाराने म्हटले आहे की, धोनीला एका नव्या फिनिशरची आवश्यकता आहे. दुसरीकडे भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने चेन्नईच्या पराभवानंतर केदार जाधववर निशाना साधला आहे. तो म्हणाला की, बाऊंड्री तर दूरची गोष्ट आहे, केदार एक धाव घेण्यासाठी धडपड करत होता.
सेहवागने व्यक्त केले मत
सेहवाग सध्या सोशल मीडियावर जोरदार सक्रिय आहे. तो सध्या प्रत्येक सामन्यानंतर फेसबुकवर एक खास कार्यक्रम ‘वीरू की बैठक’ करतो. येथे तो खेळाडू, सामन्याबद्दल आपले स्पष्ट मत मांडतो. अशामध्ये त्याने पुन्हा एकदा पराभव मिळाल्यानंतर चेन्नईबद्दल आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, “सर्वांनी सांगितल्यानंतर धोनी आज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. केदार जाधव धाव घेण्यासाठी पळतही नव्हता. माझ्या मते त्याला ‘सामनावीर’ पुरस्कार द्या.”
https://www.facebook.com/watch/?v=1489814917895229
का होत आहे केदार जाधववर टीका
सध्या सगळीकडे केदार जाधववर टीका केली जात आहे. जाधव एकेक धावेसाठी संघर्ष करताना दिसत होता. धोनी बाद झाल्यानंतर १७ व्या षटकात फलंदाजीसाठी आलेल्या जाधवला आपले खाते उघडण्यासाठीच ५ चेंडू लागले. २० व्या षटकात जेव्हा चेन्नईला २६ धावांची आवश्यकता होता, तेव्हा जाधवने पहिल्या दोन्ही चेंडूंवर एकही धाव घेतली नाही. तिसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली. १२ चेंडू खेळताना केवळ ७ धावा करत तो नाबाद राहिला. अशाप्रकारे चेन्नई संघ १० धावांनी हा सामना पराभूत झाला.