दुबई। बीसीसीआयने आगामी आयपीएलसाठी व्हीपीएस हेल्थकेअरची अधिकृत कोविड- १९ टेस्टिंग एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे ही कंपनीकडून जवळपास तीन महिन्यांसाठी २०,००० पेक्षा जास्त चाचण्या घेण्यात येतील.
कंपनीने पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “२०,००० चाचण्यांमध्ये सर्व खेळाडू, फ्रँचायझींचे सहाय्यक कर्मचारी, बीसीसीआयचे अधिकारी आणि आयपीएलच्या भागधारकांचा समावेश असेल.”
“आम्ही बीसीसीआयशी स्पर्धा आयोजित करण्याच्या आवश्यकतेनुसार इतर सहयोगी वैद्यकीय सेवा देण्याच्या तरतुदीबाबतही चर्चा करीत आहोत,” असे या निवेदनात म्हटले आहे.
संघातील सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांची ‘जैव सुरक्षित’ वातावरणात प्रवेश करण्यास परवानगी देण्यापूर्वी पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी चाचणी केली जाईल.
त्यानंतर स्पर्धेदरम्यान प्रत्येक पाचव्या दिवशी खेळाडू आणि इतरांची चाचणी घेण्यात येईल.
आयपीएलच्या १३व्या हंगामाचे आयोजन १९ सप्टेंबरपासून ते १० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या हंगामासाठी आयपीएलचे सर्व फ्रंचायझी संघ यूएईत दाखल झाले आहेत.





