कोरोना महामारीमुळे यंदा यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंतचे सामने चुरशीचे पाहायला मिळाले. या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नेहमी प्रमाणेच आक्रमक पद्धतीने विजयी सुरुवात केली. परंतु नंतर त्यांना सलग तीन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्यावर्षीच्या चॅम्पियन संघाने मुंबई इंडियन्सने या वेळी पराभवासह सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर आतापर्यंत मुंबईने तीन महत्त्वपूर्ण सामने जिंकले आहेत.
त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्स संघानेही उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या पहिल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता. तसेच राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२० मधील आपल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जसारख्या बलाढ्य संघाला १६ धावांनी पराभूत केले होते.
परंतु आयपीएल २०२० मध्ये असे ३ संघ आहेत ज्यांना कदाचित या वेळी प्लेऑफ मध्ये प्रवेश मिळवणे अवघड जाईल.
३. किंग्ज इलेव्हन पंजाब
इंडियन प्रीमियर लीगमधील किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मोहिमेची सुरुवात पराभवाने झाली. या संघाचे फलंदाज यावेळी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत असले तरी, तरीही किंग्ज इलेव्हन पंजाबला आतापर्यंतच्या ५ सामन्यांपैकी ४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये सुरुवातीच्या सामन्यात पंजाब संघाला दणदणीत पराभूत केले. त्याचवेळी पंजाब संघाने त्यांच्या दुसर्या सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले.
दुसर्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने कर्णधार केएल राहुलच्या १३२ धावांच्या खेळीच्या जोरावर आरसीबीसमोर २०६ धावांचे लक्ष्य ठेवले आणि नंतर आरसीबीला या सामन्यात ९७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. पुन्हा तिसऱ्या सामन्यात पंजाब संघाचा पराभव झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सनेही पंजाबच्या २२४ धावांचे लक्ष्य सहज सहज गाठले आणि राजस्थान रॉयल्सने आयपीएलमधील सर्वात मोठा विजय नोंदविला. तर चौथ्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा मुंबई इंडियन्सकडून पराभव झाला. पाचव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने एकही गडी न गमावता पंजाबवर विजय नोंदविला.
आयपीएल २०२० मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब ज्या प्रकारे पराभव होत आहे, ते पाहून असे म्हणता येईल की किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न पुन्हा अपूर्ण ठरेल आणि संघ चॅम्पियन बनण्यापासून दूर असेल. आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यातील ४ सामने गमावून हा संघ गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर आहे.
२. सनरायझर्स हैदराबाद
आयपीएल २०१६ मध्ये चमकदार कामगिरी करून त्या हंगामातील विजेतेपद जिंकणार्या सनरायझर्स हैदराबाद संघाची आयपीएल २०२० मध्ये विषेश अशी कामगिरी अजून झालेली नाही. जगातील सर्वात आक्रमक सलामीवीर असलेला हा संघ आहे. पण आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत फक्त दोन सामने जिंकण्यात ते यशस्वी झाले आहेत. या संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि गोलंदाज राशिद खान प्रत्येक वेळी आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करत आले आहेत.
सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत, त्यापैकी पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून दहा धावांनी पराभव पत्करावा लागला. दुसर्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कोलकाता नाईट रायडर्सने ७ गडी राखून पराभव केला आणि केकेआरने या सामन्यात आयपीएल २०२० चा पहिला विजय नोंदविला. त्यांच्या तिसर्या सामन्यात हैदराबादचा संघ कसाबसा परतला आणि दिल्ली कॅपिटल्सच्या विरुद्ध १५ धावांनी विजयी झाला.
या संघाने आयपीएल २०२० मध्ये आपला पहिला विजय नोंदविला. चौथा सामना चेन्नई संघासोबत झाला आणि त्या सामन्यातही हैदराबाद संघ ७ गडी राखून विजयी झाला असला तरी, हैदराबादला पाचव्या सामन्यात मुंबईकडून पराभव पत्करावा लागला. आतापर्यंत संघाची कामगिरी पाहून सनरायझर्स हैदराबादचे आयपीएल २०२० मधील प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न अपूर्ण ठरू शकते असे म्हणता येईल. कारण सध्या या हंगामात हा संघ गुणतालिकेत ४ गुणांसह ७ व्या क्रमांकावर आहे.
१. चेन्नई सुपर किंग्ज
आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने तीन वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. प्लेऑफमध्ये सर्वाधिकवेळा पोहोचण्याचा विक्रम चेन्नई सुपरकिंग्जच्याच नावावर आहे. पण आयपीएल २०२० मध्ये हा संघ जशी कामगिरी करत आहे, हे पाहता असे दिसते की या वेळी संघ प्लेऑफच्या फेरीला चुकवण्याची शक्यता आहे.
याचे सर्वात मोठे कारण म्हणजे संघाचा सर्वात महत्वाचा फलंदाज मानल्या जाणाऱ्या सुरेश रैनाने आयपीएल २०२० मधून स्वत: माघार घेतली, तर हरभजन सिंगचादेखील या वेळी समावेश नाही. रैनाच्या अभावी संघातील फक्त दोन फलंदाज फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांनी आपल्या फलंदाजीतून सिद्ध केले आहे. यापैकी पहिले नाव अंबाती रायुडू आणि दुसरे नाव फाफ डु प्लेसिस आहे. पहिल्या सामन्यात अंबाती रायुडूने ७१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारून सामना जिंकणारा डाव खेळला. मात्र, त्यानंतर दुखापतीमुळे या खेळाडूला काही सामन्यांतून बाहेर पडावे लागले, त्यानंतर फाफ डु प्लेसिसनेही सातत्याने धावा केल्या आहेत. संघातील अन्य दिग्गज खेळाडूंची कामगिरी संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय राहिली आहे.
सीएसकेने आतापर्यंत आयपीएल २०२० मध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स तसेच सनरायझर्स हैदराबाद संघांविरुद्ध सलग पराभव पत्करावा लागला होता. चेन्नई सुपर किंग्जने असेच सुरू ठेवले तर हा संघ यावेळी प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी गमावू शकतो. चेन्नई संघाने या हंगामात आतापर्यंतच्या ५ सामन्यातील २ सामने जिंकले असून संघ गुणतालिकेत ६ व्या क्रमांकावर आहे.