आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यावर्षी ही स्पर्धा अर्ध्यातून स्थगित करण्यात आली होती. आता या हंगामातील उर्वरित सामने पुन्हा खेळवले जाणार असून त्याआधी आयपीएलच्या तीन संघांना मोठे झटके बसले आहेत. भारतासोबतचा पाचवा कसोटी सामना रद्द झाल्यामुळे इंग्लंड क्रिकेट संघाने त्यांच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी नकार दिला आहे. यामध्ये दिग्गज फलंदाज डेविड मलान, जाॅनी बेयरस्टो आणि अष्टपैलू ख्रिस वोक्स या तीन नावांचा समावेश आहे.
डेविड मलान पंजाब किंग्ज संघाचा भाग होता, तर ख्रिस वोक्स दिल्ली कॅपिटल्स संघाचा खेळाडू होता. तसेच जाॅनी बेयरस्टो सनराइझर्स हैदराबाद संघाचा महत्वाचा खेळाडू होता. पंजाब किंग्जने इंग्लंडचा दिग्गज फलंदाज डेविड मलानला आयपीएल २०२१ च्या लिलावामध्ये विकत घेतले होते.
आता पंजाबच्या संघात मलानच्या जागेवर आता ऍडम मार्करम याला सामील केले जाणार आहे. मार्करमचा हा पहिलाच आयपीएल हंगाम असेल. तसेच जाॅनी बेयरस्टोच्या जागेवर शेरफेन रुदरफोर्ड याला सनरायझर्स हैदराबाद संघात संधी देणार आहे. रुदरफोर्ड यापूर्वी हैदराबाद संघाचा भाग राहिला आहे. तसेच त्याला मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघानेही संधी दिली होती.
इंग्लंडचे हे तीन खेळाडू भारतासोबतचा कसोटी मालिकेतील पाचवा सामना रद्द झाल्यानंतर आयपीएलमध्ये खेळणार नसल्याची माहिती पुढे आली. आयपीएलच्या या हंगामामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने चांगले प्रदर्शन केले आहे. संघाने खेळलेल्या ८ सामन्यांपैकी ६ मध्ये विजय मिळवला असून संघ १२ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तसेच पंजाब किंग्ज संघाने ८ सामन्यांपैकी केवळ ३ सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत ६ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाची या हंगामातील कामगिरी खराब राहिली आहे. संघाने खेळलेल्या ७ सामन्यांपैकी केवळ १ सामना संघाला जिंकला आला आहे. त्यांच्या खराब प्रदर्शनामुळे संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.
आयपीएल २०२१ च्या हंगामातील पहिले २९ सामने भारतात खेळले गेले होते. त्यानंतर भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि काही संघाच्या आणि सपोर्ट स्टाफच्या खेळाडूंना झालेली कोरोनाची लागण या पार्श्वभूमीवर हंगाम आर्ध्यातून स्थगित करण्यात आला होता. आता या हंगामातील उर्वरित सामने यूएईमध्ये आयोजित केले गेले आहेत. आयपीएलनंतर काही दिवसातच १५ ऑक्टोंबरपासून आयसीसी टी२० विश्वचषक यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर जेम्स अँडरसन घेणार निवृत्ती? गोलंदाजाने स्व:त सांगितले सत्य






