आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाची सुरुवात खूपच चांगली राहिली आहे. केकेआरने दुसऱ्या टप्प्यातील पहिले दोन्ही सामने जिंकले असून, याचे सर्वाधिक श्रेय संघाला नव्याने लाभलेला सलामीवीर फलंदाज व्यंकटेश अय्यरला जाते. त्याला दुसऱ्या टप्प्यात पहिल्यांदाच संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले. व्यंकटेशनेही संघ व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. पहिल्या सामन्यात आरसीबी आणि दुसऱ्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने दमदार खेळी केली आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर त्याच्या क्रिकेटर बनण्यामागे माजी भारतीय कर्णधार प्रेरणा असल्याचे सांगितले.
या खेळाडूपासून प्रेरणा घेत व्यंकटेश बनला क्रिकेटपटू
गुरुवारी (२३ सप्टेंबर) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठीने दमदार फलंदाजी केली आहे. सामन्यानंतर या दोघांमध्ये चर्चा चालू होती, ज्याचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत वेबसाईडवर शेअर केला गेला आहे. व्हिडिओमध्ये व्यंकटेश म्हणत आहे की,
“खर सांगायच तर केकेआर पहिली फ्रेंचायझी होती, ज्यामधे माझी खेळण्याची इच्छा होती, तेही सौरव गांगुली यांच्यामुळे. ते सुरुवातीला या संघाचे कर्णधार होते. जेव्हा मला केकेआरमध्ये निवडले गेले, हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखे होते. मला केकेआरमध्ये सामील झाल्यावर खूप चांगले स्वागत मिळाले होते.”
तो म्हणाल, “मी दादाचा खूप मोठा चाहता आहे. त्यांचे जगभरात लाखो चाहते आहेत आणि मी त्यांच्यातलाच एक आहे. माझ्या व्यवसायिक क्रिकेटर बनण्यामागे त्यांचा खूप मोठा हात राहिला आहे. मी जेव्हा छोटा होतो तेव्हा मी उजव्या हाताने फलंदाजी करायचो. मात्र, मला अगदी दादांसारखे खेळायचे होते, जसा ते षटकार मारायचे, ज्याप्रकारे ते फलंदाजी आणि गोलंदाजी करायचे त्याचा माझ्या जीवनावर खूप मोठा प्रभाव राहिला आहे आणि मी त्यासाठी त्यांचा आभारी आहे.”
केकेआरने मुंबईविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. मुंबई इंडियन्स संघ चौथ्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरला आहे.