आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सला मोठा झटका मिळाला आहे. यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात केकेआरच्या महत्वाच्या गोलंदाजाला दुखापत झाली आहे. संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. दुखापतीमुळे तो आयपीएलच्या राहिलेल्या सामन्यांमध्ये सहभागी होणार नाही. तो भारतात परतला असून देशांतर्गत क्रिकेट खेळेल की नाही? याबाबतही शंका उपस्थित झाली आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर याबाबत माहिती दिली आहे. तो म्हणाला, “होय, आम्हाला सूचना मिळाली आहे की सराव सत्रादरम्यान कुलदीपच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. शक्यतो क्षेत्ररक्षणावेळी त्याचा गुडघा वाकला आणि त्यावेळी त्याची दुखापत गंभीर होती. याची काहीच शक्यता नव्हती की, तो आयपीएलमध्ये पुढे भाग घेऊ शकेल आणि त्यामुळेच त्याला भारतात पाठवले गेले आहे.”
मैदानावर पुन्हा खेळण्यासाठी लागणार बराच कालावधी
कुलदीपच्या दुखापतीविषयी माहिती असलेल्या दुसऱ्या एका सुत्राने सांगितले आहे की, “गुडघ्याची दुखापत सहसा गंभीर असते. सर्वात पहिले काम सुरु करणे, एनसीएमध्ये फिजियोथेरेपी सत्रात मजबूती मिळवणे, त्यानंतर थोडा सराव आणि नंतर सराव सत्र, ही पूर्ण प्रक्रिया खूप मोठी आहे. निश्चित प्रकारे हे सांगितले जाऊ शकत नाही की, रणजी ट्रॉफी समाप्त होण्याआधी तो सामना खेळण्यासाठी तयार होईल.”
यादरम्यान कुलदीपने त्याच्या ट्वीटरवर केकेआरचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅकुलमसोबत एक फोटो शेअर केला होता, ज्यांचा सोमवारी वाढदिवस होता. याबाबत सूत्राने सांगितले की, “तो जुना फोटो असेल. कुलदीप भारतात परत आला आहे. जर माझा अंदाज चुकीचा नसेल तर त्याची शस्त्रक्रियाही झालेली आहे.”
सध्या कुलदीप भारतीय संघाचा भाग नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कुलदीपने सिडनीमध्ये ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. त्यावेळी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी तो विदेशी परिस्थितीत भारताचा क्रमांक एकचा फिरकी गोलंदाज असल्याचे म्हटले होते. परंतु आयपीएल २०१९ मध्ये त्याचा फॉर्म खराब दिसला. त्यानंतर फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवरही भारतीय संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही. तो मुख्य संघात असताना देखील त्याच्याऐवजी राखीव खेळाडूंपैकी फिरकी गोलंदाज शाहबाज नदीमला संधी दिली गेली होती.
मागच्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर कुलदीपला संधी दिली गेली होती. या दौऱ्यात त्याने एकदिवसीय सामन्यात ४८ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच टी २० सामन्यात त्याने ३० धावा देत २ विकेट्स मिळवल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला त्याची पाकिस्तानातच बेईज्जती करायची होती’, कैफने सांगितलं कशी केली अख्तरची फजिती?
वॉर्नर तुस्सी ग्रेट हो! ज्या खेळाडूमुळे गेले संघातील स्थान, त्याचीच थोपटली पाठ; बघा व्हिडिओ
‘सूर्यकुमारचा हनिमून पिरियड आता संपलाय’, सतत फ्लॉप ठरत असल्याने चाहत्यांकडून होतोय ट्रोल