चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील १७ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने ९ विकेट्सने विजय मिळवत गतविजेत्या मुंबईला पराभवाचा धक्का दिला. पंजाबच्या या विजयात कर्णधार केएल राहुलचा मोठा वाटा राहिला. त्याने अर्धशतकी खेळी केली, याबरोबरच एक विक्रमही केला.
राहुलचे विक्रमी अर्धशतक
या सामन्यात मुंबईने पंजाबला १३२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राहुलने ५२ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद ६० धावा केल्या. राहुलचे हे पंजाब संघाकडून केलेले २० वे अर्धशतक होते. राहुलने पंजाबकडून २ शतकेही यापूर्वी झळकावली आहेत. त्यामुळे तो आता पंजाबकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक २२ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम शॉन मार्शच्या नावावर होता. त्याने २१ वेळा पंजाबकडून ५० धावांचा टप्पा पार केला आहे.
केएल राहुलने गेलसह नाबाद भागीदारी करत पंजाबला मिळवून दिला विजय
केएल राहुलने १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला मयंक अगरवालसह ५३ धावांची भागीदारी केली. तो २५ धावांवर बाद झाल्यानंतर त्याने ख्रिस गेलसह नाबाद ७९ धावांची भागीदारी करत पंजाबला १८ व्या षटकातच १३२ धावांवर पोहचवत विजय मिळवून दिला. गेलने ३५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या.
मुंबईकडून केवळ राहुल चाहरला १ विकेट घेण्यात यश आले. त्याने मयंक अगरवालला बाद केले.
मुंबईच्या केवळ १३१ धावा
तत्पूर्वी या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाने सुरुवातीला खुप संयमी खेळ केला होता. त्यातच त्यांनी क्विंटन डी कॉक आणि ईशान किशनच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादवने ७९ धावांची भागीदारी करत मुंबईचा डाव सावरला.
पण, ही भागीदारी रंगत असतानाच १७ व्या षटकात रवी बिश्नोईने सुर्यकुमारला ३३ धावांवर ख्रिस गेलकरवी झेलबाद केले. तर १८ व्या षटकात रोहित शर्मा मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर फॅबिएन ऍलेनकडे झेल देऊन बाद झाला. रोहितने ५२ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले.
रोहितनंतर मुंबईकडून फलंदाजीला आलेल्या हार्दिक आणि कृणाल या पंड्या बंधू आणि कायरन पोलार्डला(१६) अखेरच्या काही चेंडूवर मोठे फटके मारण्यात अपयश आले. त्यामुळे अखेर मुंबईला २० षटकात ६ बाद १३१ धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
थ्री इन वन! राजस्थानचा गोलंदाज करतोय भज्जी, बुमराह आणि अश्विनसारखी गोलंदाजी, पाहा व्हिडिओ
भारतीय महिला बॉक्सर्सची ऐतिहासिक कामगिरी, जिंकले सात सुवर्ण; नागपूरच्या अल्फियाचा समावेश