चेन्नई। शुक्रवारी(२३ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील १७ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने ९ विकेट्सने विजय मिळवला. हा त्यांचा हंगामातील दुसरा विजय ठरला.
या सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १३१ धावा केल्या. तसेच पंजाबला विजयासाठी १३२ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पंजाबने १७.४ षटकात केवळ १ विकेट गमावत सहज पार केले.
पंजाबकडून मयंक अगरवाल आणि कर्णधार केएल राहुल सलामीला फलंदाजीला उतरले होते. या दोघांनीही पंजाबला ५३ धावांची सलामी देत चांगली सुरुवात करुन दिली. अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाल्यानंतर मयंक अगरवाल ४ चौकार आणि १ षटकारांसह २० चेंडूत २५ धावांवर बाद झाला. त्याला राहुल चाहरने बाद केले.
यानंतर मात्र राहुलने ख्रिस गेलला साथीला घेत एकही विकेट जाऊ दिली नाही. या दोघांमध्ये नाबाद ७९ धावांची भागीदारी झाली. त्यामुळे पंजाबने १८ व्या षटकातच १३२ धावा करत विजयाला गवसणी घातली. यादरम्यान केएल राहुलने त्याचे वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. त्याने ५२ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद ६० धावा केल्या. तसेच ख्रिस गेलने ३५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या.
रोहित शर्माच्या अर्धशतकामुळे मुंबईच्या १३१ धावा
मुंबईकडून क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. मात्र, दुसऱ्याच षटकात दीपक हूडाच्या गोलंदाजीवर डी कॉक ३ धावा करुन बाद झाला. यानंतर ईशान किशनने रोहितबरोबर संयमी फलंदाजी केली होती, पण ईशान किशन ७ व्या षटकात १७ चेंडूत ६ धावा करुन रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक केएल राहुलकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर मात्र, सुर्यकुमार यादवला साथीला घेत रोहितने मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही केली.
तसेच डावाच्या १४ व्या षटकात रवी बिश्नोईविरुद्ध चौकार ठोकत रोहितने ४० चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने आणि सुर्यकुमारने मिळून मुंबईला १५ षटकापर्यंत ९७ धावांपर्यंत पोहचवले.
मात्र, १७ व्या षटकात अखेर रवी बिश्नोईने सुर्यकुमारला ३३ धावांवर ख्रिस गेलकरवी झेलबाद केले. त्यामुळे सुर्यकुमार आणि रोहितमधील ७९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर लगेचच १८ व्या षटकात अर्धशतकी खेळी केलेला रोहित शर्मा मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर फॅबिएन ऍलेनकडे झेल देऊन बाद झाला. रोहितने ५२ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले.
तो बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्यालाही खास काही करता आले नाही. हार्दिक १९ व्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर १ धाव करुन बाद झाला. त्यापाठोपाठ शेवटच्या षटकात कृणाल पंड्याही ३ धावा करुन मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. त्याचा शानदार झेल निकोलस पूरनने घेतला. अखेर कायरन पोलार्डने मुंबईला २० षटकात १३१ धावांपर्यंत पोहचवले. पोलार्ड १६ धावांवर नाबाद राहिला.
पंजाबकडून मोहम्मद शमी आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर दीपक हूडा आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी १ विकेट घेतली.
पंजाबने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय
या सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी पंजाबने अंतिम ११ जणांच्या संघात १ बदल केला. त्यांनी रवी बिश्नोईला मुरुगन अश्विनऐवजी संघात संधी दिली. तर मुंबईने अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केला नाही.
असे आहेत ११ जणांचे संघ
पंजाब किंग्स – केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मयंक अगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, दीपक हूडा, मोझेस हेन्रिक्स, शाहरुख खान, फॅबियन ऍलन, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कायरन पोलार्ड, जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट