अहमदाबाद। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २६ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने ३४ धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १८० धावा केल्या. तसेच बेंगलोरला विजयासाठी १८० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला २० षटकात ८ बाद १४५ धावा करता आल्या.
पंजाबने दिलेल्या १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बेंगलोरकडून कर्णधार विराट कोहलीसह देवदत्त पडीक्कलने डावाची सुरुवात केली. मात्र, पडीक्कल केवळ ७ धावा करुन तिसऱ्या षटकात रेली मेरीडीथच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर रजत पाटिदारने विराटची चांगली साथ दिली.
या दोघांनी ४३ धावांची भागीदारी केली. मात्र, ही भागीदारी रंगत असतानाच हरप्रीत ब्रारने कमाल केली. त्याने ११ व्या षटकात पहिल्याच चेंडूवर विराटला ३५ धावांवर त्रिफळाचीत केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर त्याने ग्लेन मॅक्सवेलला शुन्यावर त्रिफळाचीत केले.
एवढेच नाही तर १३ व्या षटकात त्याने धोकादायक एबी डिविलियर्सचा अडथळाही दूर केला. डिविलियर्स ३ धावांवर बाद झाला. त्यामुळे रजत पाटिदारला साथ देण्यासाठी शाहबाज अहमद मैदानात उतरला.
2⃣ in 2⃣! 👌👌
Harpreet Brar has scalped two big wickets on successive deliveries. 👍👍#RCB lose Virat Kohli & Glenn Maxwell. #VIVOIPL #PBKSvRCB @PunjabKingsIPL
Follow the match 👉 https://t.co/GezBF86RCb pic.twitter.com/kFsfyF5VtZ
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2021
रजत आणि शाहबाजने बेंगलोरचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बेंगलोरला ९० धावांचा आकडा पार करुन दिला. मात्र, १५ व्या षटकात रजतला ख्रिस जॉर्डनने बाद केले. त्याने ३१ धावा केल्या. त्यानंतर लगेचच १६ व्या षटकात लागोपाठच्या चेंडूंवर शाहबाज आणि डॅनिएल सॅम्स हे दोघे रवी बिश्नोईविरुद्ध खेळताना बाद झाले. शाहबाजने ८ धावा केल्या. तर सॅम्सने ३ धावा केल्या.
अखेर काईल जेमिसनने हर्षल पटेलसह पराभवाचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. जेमिसन धावांवर १६ नाबाद राहिला. तर हर्षल १३ चेंडूत ३१ धावांवर अखेरच्या षटकात बाद झाला.
पंजाबकडून हरप्रीत ब्रारने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच रवी बिश्नोईने २ विकेट्स घेतल्या. रिली मेरीडिथ, मोहम्मद शमी आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
केएल राहुलचे नाबाद अर्धशतक
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबकडून कर्णधार केएल राहुल आणि प्रभसिमरन सिंग यांनी सलामीला फलंदाजी केली. पण प्रभसिमरन केवळ ७ धावा करुन काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर चौथ्या षटकात बाद झाला. पण त्यानंतर मैदानात ख्रिस गेल नावाचं वादळ अवतरलं. त्याने ६ व्या षटकात काईल जेमिसनविरुद्ध ५ चौकार मारत २० धावा वसूल केल्या. मात्र, ११ व्या षटकात २४ चेंडूत ४६ धावा करुन गेल डॅनिएल सॅम्सच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक एबी डिविलियर्सकडे झेल देऊन बाद झाला. तो बाद झाल्याने त्याची केएल राहुलबरोबरची ८० धावांची भागीदारीही तुटली.
गेल बाद झाल्यानंतर पंजाबच्या निकोलस पूरन, दीपक हूडा आणि शाहरुख खानने स्वस्तात विकेट गमावल्या. पूरन आणि शाहरुख एकही धाव करु शकले नाही. तर हूडाने केवळ ५ धावा केल्या. पण नंतर हरप्रीत ब्रारने केएल राहुलची चांगली साथ दिली. दरम्यान, केएल राहुलने अर्धशतकी खेळी केली. २० षटकांअखेर राहुलने हरप्रीतच्या साथीने पंजाबला १७९ धावांपर्यंत पोहचवले. राहुल ५७ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ९१ धावांवर नाबाद राहिला, तर हरप्रीत १७ चेंडूत २५ धावांवर नाबाद राहिला.
बेंगलोरकडून काईल जेमिसनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच डॅनिएल सॅम्स, युजवेंद्र चहल आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
नाणेफेकीचा कौल बेंगलोरच्या पारड्यात
या सामन्यात बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी बेंगलोरने अंतिम ११ जणांच्या संघात शहाबाज अहमदचा वॉशिंग्टन सुंदरऐवजी समावेश केला आहे. तसेच पंजाबने ३ बदल केले आहेत. मोझेस हेन्रीक्स, अर्शदीप सिंग आणि मयंक अगरवाल या तिघांना अंतिम ११ जणांच्या पंजाब संघातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर प्रभसिमरण सिंग, हरप्रीत ब्रार आणि रिले मेरीडिथ यांना संधी देण्यात आली आहे.
Toss Update: @imVkohli has won the toss & @RCBTweets have elected to bowl against @PunjabKingsIPL. #VIVOIPL #PBKSvRCB
Follow the match 👉 https://t.co/GezBF86RCb pic.twitter.com/TfpPY6zRbz
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2021
असे आहेत ११ जणांचे संघ
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पदीकल, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, डॅनियल सॅम्स, काईल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.
पंजाब किंग्ज: केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), ख्रिस गेल, दीपक हूडा, निकोलस पूरन, प्रभसिमरण सिंग, शाहरुख खान, ख्रिस जॉर्डन, रिले मेरीडिथ, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, हरप्रीत ब्रार