---Advertisement---

भारीच! २० चेंडूत अर्धशतक करणाऱ्या दीपक हुडाने ‘या’ विक्रमाच्या यादीत केली विरेंद्र सेहवाग, हार्दिक पंड्याची बरोबरी

On: मंगळवार, एप्रिल 13, 2021 2:06 AM
Deepak-Hooda
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील चौथा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने संघाने ४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पंजाबकडून वादळी अर्धशतक करणाऱ्या दीपक हुडाने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्स संघाकडून खेळताना दीपक हुडाने २० चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने या सामन्यात एकूण २८ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ६ षटकार मारले. तसेच त्याच्यासह पंजाबचा कर्णधार केएल राहुलने ९१ धावांची खेळी केली. त्यामुळे पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २२१ धावांचा डोंगर उभा केला होता.

दीपकने २० चेंडूत अर्धशतक केल्याने त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध जलद अर्धशतक करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर संयुक्तरित्या असलेल्या विरेंद्र सेहवाग आणि हार्दिक पंड्याची बरोबरी केली आहे. सेहवागने २०१२ आयपीएल हंगामात राजस्थानविरुद्ध २० चेंडूत अर्धशतक केले होते. तर हार्दिकने मागीलवर्षी राजस्थान विरुद्ध २० चेंडूत अर्धशतक केले होते.

या यादीत अव्वल क्रमांकावर डेव्हिड मिलर आहे. मिलरने २०१४ हंगामात १९ चेंडूत राजस्थान रॉयल्स विरुद्ध अर्धशतक केले होते. विशेष म्हणजे त्यावेळी मिलर पंजाब संघाकडूनच खेळत होता.

राजस्थानचा पराभव 
सोमवारी पंजाब किंग्सविरुद्ध २२२ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानला २० षटकांत ७ बाद २१७ धावा करता आल्या. अखेरच्या चेंडूवर राजस्थानला विजयासाठी ५ धावांची गरज होती. त्यावेळी शतकी खेळी करणारा राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन षटकार मारण्याच्या नादात बाद झाला आणि हा सामना पंजाबने जिंकला. सॅमसनने ६३ चेंडूत ११९ धावा करताना १२ चौकार आणि ७ षटकार मारले.

त्याच्याव्यतिरिक्त राजस्थानचा अन्य कोणताही फलंदाज ३० धावांचा टप्पा पार करु शकला नाही. जॉस बटलर(२५), शिवम दुबे (२३) आणि रियान पराग (२५) यांनी छोटेखानी आक्रमक खेळी केल्या. मात्र, यातील कोणाही सॅमसनला अधिक काळ साथ देऊ शकले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या –

बरोबर ६ वर्षांनी हुडाने केली तशीच अर्धशतकी खेळी, फरक फक्त एवढाच तेव्हा राजस्थानसाठी तर आता राजस्थानविरुद्ध

‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलच आहे आयपीएलमधील ‘षटकार किंग’, हा विक्रम पाहून विश्वास बसेल.

वाह राहुल! तेवतियाने घेतला बाऊंड्री लाईनवर डोळे दिपवणारा झेल, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---