---Advertisement---

RR vs KKR : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीला फलंदाजांची साथ; राजस्थानचा कोलकाताविरुद्ध ६ विकेट्सने विजय

On: शनिवार, एप्रिल 24, 2021 11:19 PM
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात शनिवारी (२४ एप्रिल) १८ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ६ विकेट्सने विजय मिळवला. हा राजस्थानचा या हंगामातील दुसरा विजय आहे.

या सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाता संघाने २० षटकात ९ बाद १३३ धावा करत राजस्थानला १३४ धावांचे माफक आव्हान दिले. हे आव्हान राजस्थानने १८.५ षटकात ४ विकेट्स गमावत सहज पूर्ण केले.

राजस्थानने दिलेल्या १३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी राजस्थानकडून जोस बटलर आणि यशस्वी जैयस्वाल उतरले होते. पण बटलर चौथ्या षटकात ५ धावांवर असताना वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर खेळपट्टीवर स्थिरावलेला जैयस्वाल पाचव्या षटकात शिवम मावीच्या गोलंदाजीवर १७ चेंडूत २२ धावा करुन बाद झाला.

पण, नंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने शिवम दुबेला साथीला घेत राजस्थानचा डाव सावरला. मात्र, या दोघांमध्ये ४५ धावांची भागीदारी झाली असतानाच दुबे ११ व्या षटकात १८ चेंडूत २२ धावा करुन चक्रवर्तीने टाकलेल्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाकडे झेल देऊन बाद झाला. यानंतर राहुल तेवतिया १४ व्या षटकात केवळ ५ धावा करुन माघारी परतला. त्याला प्रसिद्ध कृष्णाने बदली क्षेत्ररक्षक कमलेश नागरकोटी करवी झेलबाद केले.

पण यानंतर सॅमसनने डेव्हिड मिलरला साथीला घेत राजस्थानला विजयापर्यंत पोहचवले. या दोघांनी नंतर विकेट न गमावता ३४ धावांची नाबाद भागीदारी करत १९ व्या षटकात राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सॅमसनने ४१ चेंडूत ४२ नाबाद धावांची खेळी केली. तर मिलर २३ चेंडूत २४ धावांवर नाबाद राहिला.

कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच शिमव मावी आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी १ विकेट घेतली.

कोलकाताच्या केवळ १३३ धावा

पहिल्या ५ विकेट्स १०० धावांच्या आतच गमावल्यानंतरही कोलकाच्या तळातील फलंदाजांना कमाल करता आली नाही. राहुल त्रिपाठीनंतर ख्रिस मॉरिसने टाकलेल्या १८ व्या षटकात आंद्रे रसल केवळ ९ धावा करुन बाद झाला. त्यापाठोपाठ त्याच षटकात खेळपट्टीवर स्थिरावलेला दिनेश कार्तिकही २५ धावा करुन बाद झाला. मॉरिसनेच टाकलेल्या अखेरच्या षटकात पॅट कमिन्स १० धावांवर आणि शिवम मावी ५ धावांवर बाद झाला. त्यामुळे कोलकाला २० षटकात केवळ १३३ धावा करता आल्या.

राजस्थानकडून ख्रिस मॉरिसने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जयदेव उनाडकट, चेतन सकारिया आणि मुस्तफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

गिल-मॉर्गन धावबाद

कोलकाताचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यांच्याकडून सलामीला नितीश राणा आणि शुबमन गिल फलंदाजीला आले. दोघांनीही चांगली सुरुवात केली होती. मात्र, गिल धाव घेताना ६ व्या षटकात दुर्दैवीरित्या जॉस बटरलच्या थेट थ्रोमुळे धावबाद झाला. त्याने ११ धावा केल्या.

त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि राणाने डाव पुढे नेला होता. पण त्यांची भागीदारी रंगेल असे वाटत असतानाच ९ व्या षटकात राणाने २२ धावा करुन चेतन सकारियाच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनकडे झेल दिला. १० व्या षटकात ६ धावा करुन सुनील नारायणही ६ धावा करुन माघारी परतला. तो जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर बाद झाला. पाठोपाठ ११ व्या षटकात कोलकाताचा कर्णधार ओएन मॉर्गन एकही चेंडू न खेळता दुर्दैवीरित्या धावबाद झाला.

पण, त्यानंतर राहुल त्रिपाठीसह दिनेश कार्तिकने कोलकाताचा डाव पुढे नेला. मात्र, त्यांची जोडीही खेळपट्टीवर स्थिरावली असतानाच त्रिपाठी मोठा फटका मारण्याच्या नादात मुस्तफिजूरच्या गोलंदाजीवर ३६ धावा करुन बाद झाला. कोलकाताने १६ षटकात ५ बाद ९८ धावा केल्या.

राजस्थानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

या सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी कोलकाता संघाने ११ जणांच्या संघात १ बदल केला. त्यांनी कमलेश नागरकोटीच्या जागेवर शिवम मावीला संघात स्थान दिले. तसेच राजस्थानने २ बदल केले असून मनन वोहराच्या जागेवर यशस्वी जैयस्वाल आणि श्रेयस गोपाळच्या जागेवर जयदेव उनाडटकला अंतिम ११ जणांच्या संघात संधी देण्यात आली.

असे आहेत ११ जणांचे संघ – 

कोलकाता नाइट रायडर्स: नितीश राणा, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, ओएन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुनील नारायण, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी, प्रसिद्धि कृष्णा

राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), डेव्हिड मिलर, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन सकरिया, मुस्तफिजुर रहमान.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---