भारतीय संघाचा फलंदाज आणि आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर आता दुखापतीतून सावरला आहे. त्याला यावर्षी मार्चमध्ये भारताच्या इंग्लंड विरुद्ध खेळताना वनडे मालिकेत खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याला क्रिकेटमधून काही महिन्यांची विश्रांती घ्यावी लागली होती. तो आता या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. तो आता आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांमध्ये तो खेळताना दिसेल.
अय्यर राॅयल लंडनमध्ये काउंटी संघ लँकशरसाठी देखील खेळणार होता. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी त्याला झालेल्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून त्याने नाव मागे घेतले. असे असले तरी तो आता पूर्णपणे फिट आहे. नुकतेच त्याने सोशल मीडियावर त्याच्या फिटनेसशी संबंधित अनेक व्हिडिओ शेअर केले होते. या व्हिडिओत तो उभ्या डोंगरावर पळताना दिसला होता.
श्रेयस अय्यर क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी खूप उत्साहित दिसत आहे. त्याच्यासाठी मागचे काही दिवस क्रिकेटपासून दूर राहणे खूप कठीण होते. खांद्यावर झालेली दुखापत आणि त्यानंतर पुनरागमनासाठी करावी लागणारी धडपड यामध्ये तो पूर्णपणे खचला होता.
त्याने इंडिया टुडेशी बोतलाना सांगितले की, ‘सध्या मला चांगले वाटत आहे. इथपर्यंतचा प्रवास चांगला होता. मात्र, जेव्हा मला दुखापत झाली होती, तेव्हा मी खूप निराश झालो होतो. मला समजत नव्हते की, मी काय करू. दुखापतीनंतर जेव्हा मी मैदानातून ड्रेसिंगरूमकडे माघारी चाललो होतो, तेव्हा रडत होतो. मला या गोष्टीला मान्य करायला थोडा वेळ लागला. असे असले तरी, तुम्हाला या गोष्टींमधून जावं लागत. मात्र, तुम्हाला जोरदार पुनरागमनासाठी प्रयत्न करावा लागतो.’
अय्यरने पुढे बोलताना सांगितले की, ‘शस्त्रक्रियेची गोष्ट ऐकून मी हैराण झालो होतो. जेव्हा मला माहित झाले की, मला खांद्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल, तेव्हा माझ्यासाठी सुरुवातीला ही गोष्ट पचवणे सोपे नव्हते. कारण या दुखापतीच्या आधी माझी फिटनेस खूप चांगली होती. मी उत्तम सराव करत होतो. मग अचानक एक दुखापत झाली. असे असले तरी, हे कोणत्याही खेळाडूच्या कारकिर्दीचा भाग आहे. मी देखील नंतर या गोष्टीला मान्य केले.’
अय्यर दिल्लीच्या संघ युएईला पोहचण्याआधीच एक आठवडा त्याचा लहानपणाचा प्रशिक्षक प्रवीण आमरेसोबत दुबईमध्ये दाखल झाला आहे. तो दुबईत सराव करतानाही दिसला होता.
यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा संघ मागच्या वर्षी यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेत अय्यरच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. मात्र, संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला होता.
अय्यरला दुखापतीमुळे आयपीएलच्या चालू हंगामातून माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद रिषभ पंतने सांभाळले. दिल्लीच्या संघाचे या हंगामातील प्रदर्शनही चांगले आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वात संघाने ८ पैकी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. संघ गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे. पण हा हंगाम स्थगित झाल्यानंतर आता परत सुरु होणार असल्याने अय्यरला उर्वरित हंगामात सहभागी होण्याती संधी मिळाली आहे.
असे असले तरी आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी दिल्ली संघाचे कर्णधारपद कोण सांभाळणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. आयपीएलचा चालू हंगाम स्थगित होण्याआधी स्पर्धेतील २९ सामने झालेले आहेत आणि राहिलेले ३१ सामने १९ सप्टेंबरपासून खेळले जाणार आहेत. दिल्लीचा पहिला सामना २२ सप्टेंबरला सनरायझर्स हैदराबाद संघासोबत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोठे बदल, आता सर्व सामने होणार क्वीन्सलँडमध्ये; पाहा संपूर्ण वेळापत्रक
अरेरे! टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या विनोद कुमारने जिंकलेले कांस्यपदक झाले ‘अमान्य’
मयंती लँगरने पती स्टुअर्ट बिन्नीचा ‘तो’ फोटो शेअर करत चाहत्यांना टाकले गोंधळात