आत्तापर्यंतच्या आयपीएल इतिहासात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला एकदाही आयपीएल विजेतेपद मिळवण्यात यश आले नाही. त्यामुळे संपूर्ण संघावर विशेष करून कर्णधार कोहलीवर बरीच टीका होत असते. या संघात कोहली आणि एबी डीविलियर्स सारखे महान फलंदाज असूनही संघाला जेतेपद जिंकण्यात अपयश आले आहे.
परंतु आयपीएल 2021 च्या सलामीच्या सामन्यातील प्रदर्शनाने हे सिद्ध झाले आहे की, यंदाच्या हंगामात हा संघ एका वेगळ्या रूपात खेळताना दिसणार आहे. आयपीएलच्या 14 व्या सत्राच्या लिलावात ग्लेन मॅक्सवेल आणि कायल जेमीसन या दोनच खेळाडूंना बंगळुरूने 29 कोटी खर्च केले आहेत.
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील पहिल्या सामन्यात बंगळुरूच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली; परंतु फलंदाजांनी मात्र निराश केले आणि अंतिम षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना गेला. तसेच कर्णधार कोहली आणि वॉशिंग्टन सुंदरने सलामीला येऊन सर्वांना आश्चर्य चकित केले. परंतु या सामन्यातील आरसीबीचे तीन खेळाडू या विजयाचे शिल्पकार ठरले.
1. ग्लेन मॅक्सवेल
पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना अपयशी ठरलेला ग्लेन मॅक्सवेल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना एका वेगळ्या रूपात दिसला. मागील मोसमात युएईमध्ये एकही षटकार मारण्यात अपयशी ठरलेला मॅक्सवेल चेन्नईमध्ये जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 28 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 38 धावा केल्या.
2. एबी डिव्हिलियर्स
दक्षिण आफ्रिकेचा 360 डिग्री फलंदाज म्हणून ओळखला जाणारा एबी डिव्हिलियर्सला या सामन्यात त्याला मधल्या स्थानावर फलंदाजीसाठी आणले गेले. यामध्ये त्याने 27 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकाराच्या साहाय्याने 48 धावा केल्या. परंतु शेवटच्या षटकात दुसरी धाव घेताना तो धावबाद झाला, अन्यथा त्याने संघाला लवकरच विजय मिळवून दिला असता.
3. हर्षल पटेल
आयपीएल 2021 अगोदर जास्त प्रकाशझोतात नसलेला हर्षल पटेल सलामीच्या सामन्यात चर्चेत आला. त्याने मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभी करण्यापासून रोखून आपल्या नावे विक्रम नोंदविला. आयपीएलच्या इतिहासात हंगामातील पहिल्याच सामन्यात 5 बळी घेणारा तो एकमेव गोलंदाज ठरला आहे.
या मध्यमगती गोलंदाजाने शानदार गोलंदाजी करीत 4 षटकांत केवळ 27 धावा देत पाच बळी घेतले. डावाच्या शेवटच्या 20 व्या षटकात त्याने पहिल्या चार चेंडूत तीन फलंदाज बाद करून फक्त एक धाव दिली. तसेच फलंदाजीमध्येही सुपर ओव्हर होणार असल्याची चिन्हे दिसत असताना त्याने तीन चेंडूंत नाबाद चार धावा करत संघाला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. तसेच त्याला या सामन्यात ‘सामनावीर’ म्हणून गौरविण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
वानखेडेत सामना पाहण्यासाठी बीसीसीआयने केली कोरोना टेस्ट बंधनकारक