अहमदाबाद। गुरुवारी (२९ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २६ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. हा सामना पंजाब किंग्सने ३४ धावांनी जिंकला. हा पंजाबचा या हंगामातील तिसरा विजय ठरला. या सामन्यादरम्यान पंजाबचा गोलंदाज रवी बिश्नोईने गोलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही कमाल केली. त्याने या सामन्यात एक अफलातून झेल घेतला.
बिश्नोईने घेतला अफलातून झेल
या सामन्यात बेंगलोर संघ १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना अखेरच्या षटकात पंजाबकडून मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता. तसेच बेंगलोरकडून काईल जेमिसन आणि हर्षल पटेल फलंदाजी करत होते. त्यावेळी विजय बेंगलोरच्या आवाक्याबाहेर गेला होता, पण हर्षल आणि जेमिसन पराभवाचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत होते. अखेरच्या षटकात शमीने लो फुलटॉस टाकला. त्यावर हर्षलने मोठा फटका मारला.
पण, त्यावेळी लाँग-ऑफवरुन पळत येत बिश्नोईने दोन्ही हात पुढे करत स्वत:ला झोकून दिले आणि तो चेंडू झेलला. त्यामुळे हर्षलला १३ चेंडूत ३१ धावा करुन माघारी परतावे लागले. बिश्नोईचा हा झेल पाहून मैदानात सर्वांनी त्याचे कौतुक केले. तसेच सामन्यातील सर्वोत्तम झेल घेण्याचा पुरस्कारही त्यालाच मिळाला.
https://twitter.com/KartikS25864857/status/1388188875885989892
https://twitter.com/asd1994/status/1388185736814288907
यापूर्वीही त्याने घेतला होता अफलातून झेल
बिश्नोईने या हंगामात शानदार झेल घेण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. त्याने यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात सुनील नारायणचा अप्रतिम झेल घेतला होता.
गोलंदाजीत चमकदार कामगिरी
बिश्नोईने गुरुवारी बेंगलोरविरुद्ध गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ४.२० ची इकोनॉमी राखत केवळ १७ धावा दिल्या. तसेच शाहबाज अहमद आणि डॅनिएल सॅम्स या दोघांच्या विकेट्सही घेतल्या.
पंजाबने मिळवला विजय
या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलच्या नाबाद ९१ धावांच्या जोरावर ५ बाद १७९ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरादाखल १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बेंगलोरला २० षटकात ८ बाद १४५ धावाच करता आल्या. पंजाबकडून हरप्रीत ब्रारने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर बिश्नोईने २ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठ्या मनाचा माणूस! ज्या गोलंदाजांने केले क्लीन बोल्ड, त्यालाच सामन्यानंतर भेटायला गेला विराट कोहली