इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल) १५वा हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहे. या हंगामात १० संघांना दोन गटात विभागण्यात आले असून संघांनी आयपीएलची तयारी सुरू केली आहे. आयपीएल २०२२मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषकातील काही खेळाडू खेळताना दिसणार आहेत. चाहत्यांच्या नजरा या खेळाडूंवरच असणार आहेत. १९ वर्षाखालील भारतीय संघाने २०२२चा विश्वचषक जिंकला आहे. यानंतर या खेळाडूंवर मोठी बोली लागली आहे.
भारतातील २ आणि विदेशातील १ खेळाडूवर कोट्यावधी रुपयांची बोली लागली. यामध्ये राज बावा, राजवर्धन हंगरेकर आणि डेवाल्ड ब्रेविस या युवा खेळाडूंचा समावेश आहे, तर भारतीय कर्णधार यश धूल आणि विक्की ओस्तवाल यांच्यावर कमी बोली लागली. या यादीत आपण अशा ४ खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात ज्यांच्यावर चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.
१. राज बावा
आयपीएल लिलावापूर्वी १९ वर्षाखालील विश्वचषकाचा अंतिम सोहळा पार पडला आणि इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. यावेळी राज बावाने (Raj Bawa) चांगली कामगिरी केली. त्याने ५ विकेट्स घेतल्या आणि ३० हून अधिक धावा केल्या. १९ वर्षाखालील विश्वचषकात राज बावा सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.
तसेच, त्याने या विश्वचषकात एक शतक सुद्धा लगावले. त्याने ६ सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आणि २५२ धावा केल्या आहेत. त्याची विश्वचषकातील कामगिरी पाहता असे वाटले होते की, त्याला आपल्या ताफ्यात सामील करण्यासाठी अनेक संघात शर्यत लागेल. पुढे झालेही तसेच. आयपीएल लिलावात बावाला पंजाब संघाने २ कोटी रुपयांना खरेदी केले. आता तो पंजाब संघासाठी उत्तम गोलंदाज म्हणून कामगिरी करेल. या आयपीएलमध्ये त्याच्यावर सर्वांचे लक्ष्य असणार आहे.
२. राजवर्धन हंगारगेकर
राजवर्धन हंगारेकरने (Rajwardhan Hangargekar) १९ वर्षाखालील विश्वचषकात फक्त ५ विकेट्स घेतल्या होत्या, परंतु त्याने स्पर्धेत चांगली कामगिरी केली. विश्वचषकादरम्यान तो संघासाठी एक उत्तम खेळाडू म्हणून समोर आला. त्याच्या स्विंगने विरुद्ध संघांच्या फलंदाजांना त्याने त्रासून सोडले. त्याने शेवटच्या फळीत खेळताना आक्रमक फलंदाजी केली. त्याने फलंदाजी करताना काही मोठे षटकार लगावले आहेत. या अष्टपैलू खेळाडूची खेळी पाहता एमएस धोनीच्या सीएसके संघाने त्याला १.५ कोटींना विकत घेतले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली हंगारेकर एक उत्तम खेळाडू म्हणून तयार होऊ शकतो.
३. यश धूल
यश धूल (Yash Dhull) हा १९ वर्षाखालील भारतीय संघाचा कर्णधार होता. भारतीय संघाच्या विजयाचा तो खरा हिरो ठरला आहे. त्याला कोरोना झाल्यामुळे त्याने अनेक सामने गमावले, परंतु त्याने पुनरागमनातच मोठे शतक लगावले. त्याने ७६.३३च्या सरासरीने २२९ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सने त्याची शानदार खेळी पाहून त्याला संघात ५० लाखांना विकत घेतले आहे. धूलने लिलावानंतर रणजी करंडक स्पर्धेत सर्वाेत्तम कामगिरी केली. रणजीच्या पदार्पणाच्या दोन्ही सामन्यात त्याने शतके लगावली. तो पुढील काळात एक उत्तम फलंदाज म्हणून तयार होऊ शकतो.
४. डेवाल्ड ब्रेविस
दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) या युवा अष्टपैलूला मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतले आहे. त्याला संघाने ३ कोटींना विकत घेतले आहे. हा खेळाडू १९ वर्षाखालील खेळाडूंमध्ये सर्वाधिक किंमतीला विकला गेला आहे. ब्रेविसने १९ वर्षाखालील विश्वचषकात शानदार कामगिरी केली आहे. त्याने ८४. ३३ च्या सरासरीने ५०६ धावा केल्या आहेत. त्याने भारताविरुद्ध ६५ धावा केल्या. यानंतर त्याला ‘बेबी डिविलियर्स’ या नावावे ओळखले जात आहे. कारण, त्याची शाॅट मारण्याची पद्धत डिविलियर्ससारखीच आहे. तो एक सलामीवीर खेळाडू आहे. हा हंगामात तो मुंबई संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
चर्चा धोनीच्या उत्तराधिकारीची; रैना म्हणतोय, ‘या’ चार खेळाडूंमध्ये आहे क्षमता
या ४ कारणांमुळे २००३ विश्वचषक ठरला जगातील आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ क्रिकेट विश्वचषक