जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टी२० लीग असलेल्या आयपीएलचा १५ वा हंगाम यावेळी भारतातच आणि त्यातही महाराष्ट्रात आयोजित केला जात आहे. चाहते या स्पर्धेसाठी प्रचंड उत्सुक आहेत. मात्र, अशातच ४ वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. या हंगामातील सर्वात महागडा गोलंदाज ठरलेला दीपक चाहर (Deepak Chahar) स्पर्धेचे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात चाहर जखमी झाला होता. आता तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीए येथे असून उपचार घेत आहे.
या हंगामात चाहर सुरुवातीचे काही सामने उपलब्ध राहणार नसल्याच्या बातमीने त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्सला मोठा फटका बसला आहे. कारण, चेन्नईने त्याला या हंगामात १४ कोटी रुपये खर्च करत आपल्या ताफ्यात सामील केले होते. महत्त्वाची बाब म्हणजे, कोणत्याही खेळाडूला आयपीएल ऑक्शनमध्ये १० कोटींहून अधिक रुपयांची बोली लावण्याची सीएसकेची पहिलीच वेळ होती.
माध्यमांतील वृत्तांनुसार, २९ वर्षीय गोलंदाज चाहर या हंगामातील सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. त्याला आपल्या दुखापतीतून सावरण्यासाठी अनेक आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.
कोलकाता येथे झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या अंतिम आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात चाहरला दुखापत झाली होती. त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेतूनही बाहेर पडला होता. चाहर दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीए येथे आहे. म्हणजेच आता तो आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर असेल. आयपीएल २०२२ची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे, तर या स्पर्धेचा अंतिम सामना २९ मे रोजी खेळवला जाईल.
आपल्या कामगिरीमुळे चाहर खूपच उत्साहित होता. त्याने केप टाऊन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या वनडे सामन्यात ५४ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, त्याने ५४ धावांची वेगवान अर्धशतकी खेळीही केली होती. मात्र, भारताला या सामन्यात ४ धावांनी पराभूत व्हावे लागले होते.
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या २ वनडे सामन्यात चाहरने ५३ धावा देत २ विकेट्स आणि ४१ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. याव्यतिरिक्त त्याने दोन्ही सामन्यात अनुक्रमे ५४ आणि ३८ धावाही कुटल्या होत्या. जखमी होण्यापूर्वी चाहरने वेस्ट इंडिजविरुद्ध अंतिम टी२० सामन्यात २ विकेट्सही घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोना संक्रमित राउफच्या जागी ‘या’ हॅट्रिकवीराची पाकिस्तानच्या कसोटी संघात वर्णी, करणार पुनरागमन