इंडियन प्रीमिअर लीगचा आनंद लुटण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलचा १५वा हंगाम अवघ्या ३ दिवसांवर येऊन ठेपला आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात २६ मार्च रोजी वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. दुसरीकडे, एकदाही आयपीएलचे विजेतेपद न जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची माजी कर्णधार विराट कोहलीही यावेळी खेळाडू म्हणून आपल्या संघाला विजेतेपद जिंकून देण्यासाठी झुंज देईल.
एकूणच टी२० क्रिकेटचा (आयपीएल) इतिहास पाहिला, तर एका हंगामात सर्वाधिक धावा ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आहे. त्याने २०१६ साली आयपीएलमध्ये ९७३ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची सरासरी तब्बल ८१ इतकी होती. त्याने अवघ्या १६ डावांमध्ये फलंदाजी केली होती. विशेष म्हणजे, या धावा ठोकताना त्याने ४ शतके आणि ७ अर्धशतकेही झळकावली होती.
विराटव्यतिरिक्त जगातील कोणताही फलंदाज टी२० क्रिकेटमध्ये एका हंगामात ९०० धावांचा आकडा पार करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानेही २०१६ साली आयपीएलच्या हंगामात ८४८ धावा ठोकल्या होत्या. या धावा करताना त्याने ९ अर्धशतके केली होती.
मुंबई इंडियन्सला ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) धावा करण्याच्या बाबतीत जरा मागेच आहे. तो आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळतोय. मात्र, त्याला एकदाही एका हंगामात ६०० धावांचा टप्पा पार करता आला नाही. म्हणजेच तो धावा ठोकण्याच्या बाबतीत विराटपेक्षा खूपच मागे आहे. रोहितने २०१३ साली सर्वाधिक ५३८ धावा केल्या होत्या.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर त्यातही विराटच अव्वलस्थानी आहे. त्याने ३७.३९च्या सरासरीने ६२८३ धावा केल्या आहेत. इतर कोणत्याही फलंदाजाला आयपीएलमध्ये ६ हजार धावा करता आल्या नाहीयेत. रोहितबद्दल बोलायचं झालं, तर तो ५६११ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विराटला अद्याप आयपीएलचे विजेतेपद जिंकता आले नाहीये. तो २००८पासून आयपीएलचा भाग आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामापूर्वी त्याने बेंगलोर संघाचे कर्णधारपद सोडले आहे. आता दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसकडे बेंगलोर संघाने कर्णधारपद सोपवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंत आणि धोनीच्या तुलनेवर शेन वॉटसनची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘या’ बाबतीत दोघेही एकसारखे
मुंबईची सलामी जोडी ते सूर्यकुमारची उपलब्धता, रोहितने आगामी आयपीएलबद्दल दिली महत्त्वाची माहिती