रविवारी (दि. ०८ मे) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ५५वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच दिल्ली संघाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्लीचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ रुग्णालयात दाखल आहे. याची माहिती त्याने स्वत: सोशल मीडियावरून दिली आहे.
पृथ्वी शॉने सोशल मीडियावरून दिली माहिती
पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर करत ही माहिती दिली. त्याने आपल्या स्टोरीमध्ये लिहिले की, “रुग्णालयात दाखल आहे आणि तापातून बरा होत आहे. तुमच्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार. लवकरच मैदानावर परत येईल.”
पृथ्वी शॉची या हंगामातील कामगिरी
पृथ्वी शॉला या हंगामात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र, त्याने संघाला पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याने अवघ्या ९ सामन्यात २८.७८च्या सरासरीने आणि १५९.८८च्या स्ट्राईक रेटने २५९ धावा चोपल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही ६१ राहिली आहे. त्याच्या नावावर या हंगामात २ अर्धशतकांचा समावेश आहे.
दिल्लीच्या प्रशिक्षकांची प्रतिक्रिया
याव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन (Shane Watson) यांनी सांगितले की, हैदराबादविरुद्धच्या सामन्यात शॉ खेळला नव्हता. पण त्याला कोरोनाची लागण झाली नाहीये. त्याने अधिक माहिती सांगण्यास नकार दिला होता. आता खुद्द पृथ्वी शॉनेच आपल्या तब्येतीबद्दल सांगितले आहे की, तो लवकरच बरा होऊन मैदान गाजवण्यासाठी पुन्हा येईल.
पृथ्वी शॉची आयपीएल कारकीर्द
आयपीएल २०१८पासून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने आतापर्यंत एकूण ६२ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २५.२३च्या सरासरीने एकूण १५६४ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १२ अर्धशतके चोपली आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही ९९ इतकी राहिली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्या बात! टुचू टुचू बॅटिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या पुजाराचा पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड षटकार
विजयरथावर स्वार राजस्थान रॉयल्सला झटका, अर्ध्यातून मॅच विनर फलंदाजाची घरी रवानगी
कोलकाताचं चुकलं कुठं? लखनऊविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं कारण