अहमदाबाद। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील अंतिम सामना रविवारी (२९ मे) रंगणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (GT vs RR) संघात होणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. यावेळी राजस्थान रॉयल्स तब्बल १४ वर्षांनंतर आयपीएलचा अंतिम सामना खेळताना दिसणार आहे.
राजस्थान रॉयल्सने यापूर्वी २००८ साली आयपीएलचा अंतिम सामना (IPL Final) खेळला होता. तसेच चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. पण त्यानंतर त्यांना आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहचता आले नव्हते. पण आता ही प्रतिक्षा संपली असून संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
राजस्थानने आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) साखळी फेरीत १४ पैकी ९ सामने जिंकले आहेत. तसेच केवळ ५ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांनी गुणतालिकेत दुसरा क्रमांक मिळवत पहिल्या क्वालिफायरमध्ये जागा मिळवली होती. पण या सामन्यात गुजरातने त्यांना पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली. त्यानंतर राजस्थानला आणखी एक संधी मिळाली. त्यांनी दुसऱ्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
तब्बल १४ वर्षांनी अंतिम सामन्यात पोहचलेल्या राजस्थानसाठी या आयपीएल हंगामात ५ गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या, ज्या त्यांच्या मजबूत बाजू म्हणूनही समोर आल्या. या लेखातही आपण त्याबद्दल जाणून घेऊ.
१. बटलरची शानदार फलंदाजी
आयपीएल २०२२ मध्ये राजस्थानसाठी सर्वात सकारात्मक गोष्ट कोणती असेल, तर सलामीवीर जोस बटलर. त्याने सुरुवातीपासूनच शानदार कामगिरी केली. त्याने या हंगामात ४ शतके ठोकताना ८०० हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच त्याने प्लेऑफच्या दोन्ही क्वालिफायर सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. त्याने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये शतकही केले. त्यामुळे अंतिम सामन्यात बटलरची कामगिरी राजस्थानसाठी सर्वात महत्त्वाची ठरणार आहे.
२. चहल-अश्विनची फिरकी जोडी
जोस बटलरच्या फलंदाजीबरोबरच राजस्थान रॉयल्ससाठी फिरकी गोलंदाजीही महत्त्वाचा पैलू ठरली आहे. त्यांना आत्तापर्यंत युजवेंद्र चहल आणि आर अश्विन या भारताच्या अनुभवी फिरकी जोडीने मोठे यश मिळवून दिले आहे. चहल सध्या आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही आहे. त्याने १६ सामन्यांत २६ विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच अश्विनने गोलंदाजीत १२ विकेट्स घेण्याबरोबरच फलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले आहे.
जर अंतिम सामना लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळवला गेला, तर फिरकीपटूंना मदत मिळू शकते. त्यामुळे असे झाले, तर चहल आणि अश्विन ही जोडी गुजरातसाठी डोकेदुखी ठरू शकते.
३. गोलंदाजीतील विविधता
राजस्थानसाठी केवळ चहल आणि अश्विन हे दोनच सकारात्मक गोष्ट नाही, तर त्यांच्या गोलंदाजीत चांगली विविधता आहे. संघात ट्रेंट बोल्ट हा देखील अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. तसेच ओबेड मॅकॉय हा देखील आहे. हे दोघेही डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतात. तसेच प्रसिद्ध कृष्णा हा उजव्या हाताने गोलंदाजी करणारा खेळाडूही राजस्थानकडे आहे. याशिवाय रियान पराग हा ज्यादाचा पर्याय देखील राजस्थानकडे आहे.
४. मजबूत फलंदाजी
राजस्थानकडे चांगल्या फलंदाजांची फळी देखील आहे. सलामीला बटलरसह युवा यशस्वी जयस्वाल फलंदाजीला येतो. त्यानेही गेल्या काही सामन्यांत चांगली लय पकडली आहे. तसेच मधल्या फळीत संजू सॅमसन आहे. तो देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तसेच मधल्या फळीला मजबूती देण्यासाठी शिमरॉन हेटमायर आणि देवदत्त पडीक्कल हे देखील आहेत. याशिवाय अष्टपैलू म्हणून रियान पराग असेल. त्यामुळे राजस्थानच्या संघातील फलंदाजांनी चांगली भागीदारी केली, तर ते मोठी धावसंख्या उभारू शकतात, तर कोणतीही धावसंख्या पार करण्याची त्यांच्यात क्षमता आहे.
५. संजू सॅमसनचे नेतृत्व
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संजू सॅमसनने नेतृत्व केले नसले, तरी त्याने त्याच्यातील नेतृत्वाची चुणूक आयपीएल २०२२ मध्ये दाखवली आहे. तसेच त्याने आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आणि विविध प्रयोग करतानाही त्याने मागे-पुढे पाहिले नाही. त्याने संघातील खेळाडूंना विश्वास देण्यासाठी स्वत:च्या फलंदाजी क्रमातही बदल केले. त्यामुळे त्याचे नेतृत्व देखील राजस्थानसाठी या संपूर्ण हंगामात जमेची बाजू ठरली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL Final | विजेत्या-उपविजेत्या संघावरच नाही, तर पुरस्कार विजेत्या खेळाडूंवरही पडणार पैशांचा पाऊस
‘कधी तुम्ही जिंकता, कधी हारता, पण…’, आरसीबीच्या चाहत्यांसाठी विराटची हृदयाला भिडणारी पोस्ट