---Advertisement---

धक्कादायक! वृद्धिमान साहाने अर्ध्यातच सोडली संघाची साथ, व्हॉट्सऍप ग्रूपमधूनही गायब

Wriddhiman-Saha
---Advertisement---

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याने बंगाल संघाकडून रणजी ट्रॉफी नॉक आऊट सामन्यात खेळण्यास नकार दिला आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशन म्हणजेच कॅबने एक निवेदन जारी करत माहिती दिली आहे. यासोबतच साहाचे बंगाल क्रिकेट संघासोबतची देशांतर्गत कारकीर्द संपुष्टात आली आहे. त्याने २००७ साली बंगालसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. बंगालला ६ जून रोजी झारखंडविरुद्ध रणजी ट्रॉफीचा उपांतपूर्व सामना खेळायचा आहे. यामध्ये साहाचा समावेश नसेल. साहा सध्या आयपीएल २०२२मध्ये गुजरात टायटन्स संघाकडून खेळत आहे. गुजरात संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. हा अंतिम सामना रविवारी (दि. २७ मे) खेळला जाईल.

बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अविषेक दालमिया (Avishek Dalmiya) यांनी एका निवेदनात म्हटले की, “कॅबची अशी इच्छा होती की, अशा निर्णायक प्रसंगी वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) संघासोबत असायला हवा होता, जेव्हा बंगाल रणजी ट्रॉफीमध्ये बाद फेरीत सामना खेळेल आणि गट स्टेजमध्ये अव्वल स्थान मिळवून विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. याबाबत मी साहाशी बोललो आणि त्याला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली. मात्र, साहाने आम्हाला रणजी ट्रॉफीचे बाद फेरीचे सामने खेळायचे नसल्याचे सांगितले आहे.”

साहाची बंगालला एनओसीची मागणी
साहा याने १२२ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्याने यापूर्वीच राज्य क्रिकेट संघटनेकडे आंतरराज्य एनओसीसाठी विनंती केली आहे. या मुद्द्यावर सीएबीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले की, “आपण काय करू शकतो? जर तो अशी आडमुठी भूमिका घेत असेल, तर त्याला आम्ही एनओसी देऊ. मात्र, माझे म्हणणे आहे की, कोणत्याही खेळाडूने राज्य क्रिकेट संघटनेशी मनमानी करू नये. कारण, संघ कोणत्याही खेळाडूपेक्षा मोठा असतो.”

साहाने सोडला बंगाल संघाचा व्हॉट्सअप ग्रूप
माध्यमांतील वृत्तांनुसार, साहाने बंगाल क्रिकेट संघाचा व्हॉट्सअप ग्रूपही सोडला आहे. अशा परिस्थितीत बंगाल संघाच्या कोचिंग स्टाफच्या एका सदस्याने सांगितले की, साहाच्या निर्णयावर मी भाष्य करणार नाही की, त्याने संघातून माघार घेण्याचा निर्णय का घेतला. मात्र, आता चित्र स्पष्ट झाले आहे. आता आम्ही त्यानुसार आमची रणनीती तयार करू शकतो.”

साहाच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १२२ प्रथम श्रेणी सामने खेळताना ४१.९८च्या सरासरीने ६४२३ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने १३ शतके आणि ३८ अर्धशतके चोपली आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---