चेन्नई सुपर किंग्स संघाची इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाची सुरुवात खराब झाली आहे. रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली सीएसकेने चालू हंगामात खेळलेल्या चारही सामन्यात संघाला अपयश आले आहे. सनरायझर्स हैदराबादने सीएसकेला आयपीएलच्या १७ व्या सामन्यात शनिवारी ८ विकेट्सने पराभूत करत आपला पहिला विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्स संघाच्या पराभवानंतर कर्णधार रविंद्र जडेजा निराश झाल्याचे दिसला.
सामन्यानंतर जडेजा म्हणाला, “आम्ही अपेक्षेनुसार सुरुवात करु शकलो नाही. आम्ही २०-१५ धावा कमीच केल्या. आमच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली आणि विकेट घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागांत सुधारणा करण्याची गरज आहे. आम्ही सर्व व्यावसायिक क्रिकेटर आहे. आम्ही बसून यावर चर्चा करु की कोठे चूक आहे. पुढच्या सामन्यात आम्ही पुनरागमन करण्याचा प्रयत्न करु.” जडेाजाचा सीएसकेकडून १५० वा सामना होता.
या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मोईन अलीने ४८ धावा, अंबाती रायुडूने २७ धावा, तर रविंद्र जडेजाने २३ धावा केल्या. यामुळे सीएसकेने २० षटकात ७ विकेट्स गमावत १५४ धावा केल्या. हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माने ७५ धावा केल्या, तर केन विलियमसनने ३२ धावा केल्या. तसेच राहुल त्रिपाठीने ३९ धावा केल्या. संघाने हे लक्ष्य १७ .४ षटकात २ विकेट्समध्येच गाठले.
सीएसके आपला पाचवा सामना १२ एप्रिलला मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर राॅयल्स चॅलेंजर्स बॅंगलोरविरुद्ध खेळणार आहे. सलग ४ सामने पराभूत झाल्यानंतर सीएसकेची प्ले ऑफमध्ये जाईल की, नाही, यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला सुद्धा या हंगामात खराब खेळीचा सामना करावा लागत आहे. तसेच गोलंदाजी युनीटमध्ये वेगवान गोलंदाज दीपक चाहरची कमी संघाला भासत आहे. सीएसकेने आयपीएल इतिहासात ४ वेळा विजेतेपद पटकवले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा