इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघ खास कामगिरी करताना दिसत नाहीये. त्यांनी आतापर्यंत 7 सामने खेळून त्यातील 3 सामन्यात विजय, तर 4 सामन्यात पराभव पत्करला आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा हादेखील चांगल्या फॉर्ममध्ये नाहीये. त्याने यादरम्यान 25.86च्या सरासरीने 181 धावा केल्या आहेत. यात फक्त 1 अर्धशतकाचा समावेश आहे. अशात रोहित शर्माला सुनील गावसकरांनी मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी रोहितला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सुनील गावसकर म्हणाले की, रोहितला आयपीएलमधून विश्रांती घेतली पाहिजे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ताजेतवाणे होऊन परतले पाहिजे.
मुंबई इंडियन्स संघाने मंगळवारी (दि. 25 एप्रिल) आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या 35व्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाविरुद्ध 55 धावांनी पराभवाचा सामना केला. मुंबईला गुजरातच्या 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 षटकात 9 विकेट्स गमावत फक्त 152 धावाच करता आल्या. यावेळी मुंबईचे फलंदाज भागीदारी रचण्यात अपयशी ठरले.
रोहितसाठी मोलाचा सल्ला
मुंबईच्या पराभवानंतर माजी भारतीय कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याविषयी मोठे भाष्य केले. गावसकर म्हणाले की, “रोहित शर्माने ब्रेक घेतला पाहिजे, जेणेकरून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी स्वत:ला ताजेतवाणे ठेवू शकेल. आयपीएलच्या अखेरच्या काही सामन्यांमध्ये पुनरागमन करावे. मात्र, यावेळी स्वत:साठी थोडा वेळ काढावा. तो आधीच चिंतेत असल्याचे दिसत आहे. असे असू शकते की, तो डब्ल्यूटीसीबाबत विचार करत आहे. माझ्यामते, त्याला काही ब्रेकची आवश्यकता आहे.”
‘यांना काढा बाहेर’
गावसकरांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांवरही राग व्यक्त केला. ते म्हणाले की, जे खेळाडू एक चूक दोनदा करत आहेत, त्यांना संघातून बाहेर काढले पाहिजे आणि त्यांना अधिक मेहनतीची गरज आहे.
गावसकर म्हणाले की, “एखादा चमत्कारच मुंबई इंडियन्स संघाला या हंगामातील प्ले-ऑफमध्ये पोहोचवू शकतो. त्यांना अखेरच्या चार संघांमध्ये पोहोचण्यासाठी आणखी चांगले क्रिकेट खेळण्याची गरज आहे. जेव्हा गोलंदाज एकच चूक सारखी करेल, तर त्याला धन्यवाद म्हणून संघातून बाहेर केले पाहिजे. थोडी विश्रांती घ्या आणि काही सामन्यांमध्ये पुनरागमन करा. आपल्या कामावर लक्ष द्या आणि शोधा की चूक कुठे होत आहे.”
भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा (World Test Championship 2023 Final) अंतिम सामना लंडनच्या के ओव्हल येथे 7 जून रोजी खेळला जाणार आहे. आयपीएल 2023चा अंतिम सामना 28 मे रोजी होईल. अशात भारतीय खेळाडूंकडे डब्ल्यूटीसी (WTC) अंतिम सामन्याची तयारी करण्यासाठी जास्त वेळ नसेल. (ipl 2023 mumbai indians captain rohit sharma should take a break says legend sunil gavaskar)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘…तर जागा मिळालीच नसती’, WTC फायनलमध्ये रहाणेची निवड होताच इरफान पठाणचे खळबळजनक भाष्य
रहाणेच्या कसोटी कमबॅकवर आली सर्वात मोठी प्रतिक्रिया, माजी निवडकर्ता आनंदी; म्हणाला, ‘याचे श्रेय…’