बुधवारी (दि. 3 मे) मुंबई इंडियन्स संघाने जबरदस्त प्रदर्शन करत पंजाब किंग्स संघाला आयपीएल 2023च्या 46व्या सामन्यात 6 विकेट्सने पराभूत केले. पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात धावांचा पाऊस पडला. शिखर धवन याच्या नेतृत्वातील पंजाबने घरच्या मैदानावर 20 षटकात 214 धावा चोपल्या होत्या. हे आव्हान रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील मुंबईने ईशान किशन (75) आणि सूर्यकुमार यादव (66) यांच्या वादळी खेळीच्या जोरावर 18.5 षटकात 3 विकेट्स गमावत 216 धावा करून पार केले. तसेच, हंगामातील पाचवा विजय साकारला. यादरम्यान पंजाब संघाला रोहितला ट्रोल करणेही महागात पडले. चला सविस्तर जाणून घेऊयात…
रोहितला ट्रोल करणे पंजाबच्या अंगलट
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा खातं खोलू शकला नाही. तो 3 चेंडूत शून्य धावावर तंबूत परतला. पहिल्या षटकातच ऋषी धवन (Rishi Dhawan) याने रोहितची विकेट काढली. रोहित बाद होताच पंजाब किंग्स संघाने ट्वीट करत रोहितला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पंजाबने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दोन ट्वीट केले. एका ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले होते की, “RO.” त्यानंतर दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी “O” (ओ) ऐवजी “0” (शून्य) लिहिले होते.
पाच वेळा आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने त्यावेळी उत्तर दिले नाही. मात्र, सामना जिंकल्यानंतर मुंबईनेही माघार घेतली नाही. रोहितला ट्रोल करणाऱ्या ट्वीटला प्रत्युत्तर देत मुंबईने रोहित शर्माच्या 6 ट्रॉफींचा उल्लेख केला. यासोबतच हेदेखील लिहिले की, पंजाबने शून्य ट्रॉफी जिंकल्या आहेत. हॅशटॅगमध्ये आदर असेही लिहिले होते. पंजाबला या दोन ट्वीटसाठी खूप ट्रोल करण्यात आले. त्यानंतर त्यांना ट्वीट डिलीट करावे लागले.
वानखेडेत झालेला आमना-सामना
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्समध्ये 22 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडिअममध्ये सामना खेळला गेला होता. त्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ अंतिम षटकात पराभूत झाला होता. त्या मैदानावरही पंजाबने अनेकदा मुंबईला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा तर सचिन तेंडुलकरशी संबंधित ट्वीटवरही पंजाबने थट्टा उडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता दुसऱ्यांदा आमना-सामना झाला, तेव्हा पंजाबला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. (ipl 2023 punjab kings delete tweet rohit sharma troll mumbai indians pbks vs mi see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये चमकला वेगवान गोलंदाज, टॉप 5 खेळाडूंच्या यादीत ‘तो’ एकटाच भारतीय
एका ओव्हरमध्ये 36 नाही, तर फलंदाजाने चोपल्या तब्बल ‘एवढ्या’ धावा, व्हिडिओ पाहून तोंडात घालाल बोटे