Two Bouncers In An One Over IPL 2024: इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित अशी टी20 स्पर्धा आहे. या स्पर्धेत जगभरातील एकापेक्षा एक खेळाडू सहभागी होऊन आपला ठसा उमटवतात. या स्पर्धेतील नियम अनेकदा प्रेक्षकांच्याही भुवया उंचावतात. मागील हंगामात स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेअर नियम आणला होता. त्यानंतर आता आयपीएल 2024 हंगामात एक मोठा नियम लागू होणार असल्याचे बोलले जात आहे.
आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामात हा नियम लागू झाल्यानंतर गोलंदाजांची चांदी होईल. तसेच, ते फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतात. खरं तर, आयपीएल 2024 हंगामात एका षटकात दोन बाऊंसर (Two Bouncers In An One Over) टाकण्याचा नियम लागू केला जाऊ शकतो. ईएसपीएन क्रिकइंफोच्या वृत्तानुसार, आयपीएल 2024मध्ये गोलंदाज एका षटकात दोन बाऊंसर टाकू शकतील, ज्यामुळे हे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरेल. मात्र, याविषयी आयपीएल किंवा बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये.
यापूर्वी काय होता नियम?
खरं तर, आतापर्यंत असा नियम होता की, गोलंदाज एकाच षटकात एकच बाऊंसर टाकू शकत होता. जर गोलंदाजाने एकापेक्षा जास्त बाऊंसर टाकले, तर चेंडू नो बॉल दिला जात होता. दीर्घ काळापासून अशी मागणी होती की, हा नियम संपवला गेला पाहिजे आणि एका षटकात 2 बाऊंसरची परवानगी दिली जावी. आता आयपीएलच्या आगामी हंगामात असे होणार असल्याची बातमी आहे. गोलंदाजांना एका षटकात दोन बाऊंसर टाकण्याची परवानगी असेल.
इम्पॅक्ट प्लेअर नियम
आयपीएल स्पर्धेत दर हंगामात नवीन नियम जोडले जात आहेत. मागील वर्षी इम्पॅक्ट प्लेअर नियम (Impact Player Rule) आणला होता. यामुळे सामन्यांवर चांगलाच प्रभाव टाकला होता. काही लोकांनी या नियमाचे समर्थन केले, तर अनेकांनी याचा विरोधही केला होता. तसेच, वाईड किंवा नो बॉल चेंडूंबाबतही फलंदाजांना रिव्ह्यू करण्याचा अधिकार देण्यात आला होता. जेणेकरून त्यांना जर शंका असेल, तर ते स्वत: समाधान करू शकतात.
आयपीएल 2024 लिलावात विकले जाणार 77 खेळाडू
दुसरीकडे, आयपीएलचे नियम नंतर येतील, त्यापूर्वी आयपीएल 2024 लिलाव (IPL 2024 Auction) पार पडणार आहे. मंगळवारी म्हणजेच, 19 डिसेंबर रोजी दुबईत हा लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठी दहा संघांनी तयारी केली आहे. यावेळी लिलावात 333 खेळाडूंनी नाव नोंदवले आहे. त्यातील 214 भारतीय खेळाडू, तर 119 परदेशी खेळाडू असतील. मात्र, यावेळी फक्त 77 खेळाडूच विकले जातील. ज्यात परदेशी खेळाडूंची संख्या 30 आहे. आता या 77 खेळाडूंमध्ये कोणता खेळाडू सर्वात महागडा ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (ipl 2024 bowlers to be able to bowl two bouncers in an over says reports read here)
हेही वाचा-
‘आता हार्दिक पंड्यासाठी…’, रोहितची MIच्या कर्णधारपदावरून हाकालपट्टी करताच इरफानच्या विधानाने खळबळ
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकरही बनले विराटचे चाहते; म्हणाले, ‘बंगळुरूमध्ये जेव्हा मी त्याला…’