आयपीएल 2024 च्या 56व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससमोर राजस्थान रॉयल्सचं आव्हान होतं. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सवर 20 धावांनी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीनं 20 षटकांत 8 गडी गमावून 221 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, राजस्थानची टीम 20 षटकांत 8 गडी गमावून 201 धावाच करू शकली.
राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसननं शानदार फलंदाजी केली. त्यानं 28 चेंडूत अर्धशतक साजरं केलं. संजू 46 चेंडूत 86 धावा करून बाद झाला. शाई होपनं सीमारेषेवर त्याचा अप्रतिम झेल घेतला. शुभम दुबे 12 चेंडूत 25 धावा करून परतला. सॅमसन आणि दुबेमध्ये अवघ्या 29 चेंडूत 59 धावांची भागीदारी झाली. मात्र ते संघाला विजयापर्यंत पोहचवू शकले नाही.
धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खूपच खराब झाली होती. सलामीवीर यशस्वी जयस्वाल दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. खलील अहमदनं त्याला 4 च्या स्कोरवर तंबूत पाठवलं. फार्मात असलेला जोस बटलर आज काही कमाल करू शकला नाही. तो 17 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. दिल्लीकडून खलील अहमद, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सनं 8 गडी गमावून 221 धावा केल्या. सर्वप्रथम जेक फ्रेझर-मॅकगर्कनं 19 चेंडूत अर्धशतक साजरं केलं. तो 20 चेंडूत 50 धावा करून बाद झाला. यानंतर अभिषेक पोरेलनं आपली ताकद दाखवत 36 चेंडूत 65 धावांची शानदार खेळी केली.
शेवटी ट्रिस्टन स्टब्सनं 20 चेंडूत 41 धावांची खेळी केली. राजस्थान रॉयल्सकडून फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं सर्वाधिक 3 बळी घेतले. त्यानं आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 24 धावा दिल्या. याशिवाय युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांना प्रत्येकी 1-1 बळी मिळाला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टिरक्षक), रियान पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेअर्स – जोस बटलर, कुलदीप सेन, टॉम कोहलर-कॅडमोर, तनुष कोटियन, कुणाल सिंग राठौर
दिल्ली कॅपिटल्स – जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, रिषभ पंत (कर्णधार/यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद
इम्पॅक्ट प्लेअर्स – रसिक दार सलाम, प्रवीण दुबे, ललित यादव, सुमित कुमार, कुमार कुशाग्रा
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये सर्वात जलद 200 षटकार मारणारा भारतीय, संजू सॅमसननं रचला इतिहास!