आयपीएल 2024 चा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. रविवारी (26 मे) फायनल सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ आमनेसामने येतील. क्वालिफायर 1 मध्येही या दोन संघांमध्येच सामना झाला होता, ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या केकेआरनं सहज विजय नोंदवला होता.
यंदा कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. टीमनं सलग विजय नोंदवत अंतिम फेरी गाठली. संघानं 14 पैकी 9 सामने जिंकून 18 गुण मिळवले होते, तर दोन सामने पावसामुळे वाहून गेल्यानं त्यांना 1-1 गुण मिळाले. कोलकाता संघानं गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, हैदराबाद संघाचा एक सामना पावसामुळे वाहून गेला होता. 14 पैकी 8 सामन्यांमध्ये विजय आणि पावसानं व्यत्यय आणलेला 1 सामना यासह एकूण 17 गुणांसह संघ दुसऱ्या स्थानावर राहिला.
अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे का? – इंडियन प्रीमियर लीगच्या या हंगामातील अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे की नाही, हे स्पष्ट नाही. गेल्या वर्षी नियोजित दिवशी अंतिम सामना होऊ शकला नव्हता. त्यामुळे राखीव दिवशी सामना खेळवण्यात आला. आता यंदा असं काही झालं तर, यावर्षी देखील अंतिम सामना राखीव दिनी खेळला जाऊ शकतो.
अंतिम सामन्यात पाऊस पडला तर? – अंतिम सामन्यात जर पावसानं व्यत्यय आणला तर किमान 5-5 षटकांचा सामना खेळवण्याचा प्रयत्न केला जाईल. हेही शक्य झालं नाही तर सामन्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारे लावला जाईल. हेही करता आलं नाही, तर गुणतालिकेत अव्वल असलेल्या संघाला विजेता म्हणून घोषित केलं जाईल. अशा परिस्थितीत कोलकाता नाईट रायडर्स यावर्षीचा विजेता ठरेल.
अंतिम सामन्यात पावसाची शक्यता किती? – आयपीएल 2024 चा अंतिम सामना चेन्नई येथे होणार आहे. या सामन्यासाठी हवामान खात्याकडून एक आनंदाची बातमी आहे. 26 मे रोजी सामन्यादरम्यान पावसाची शक्यता फारच कमी आहे. यादिवशी 5 ते 7 टक्के पावसाचा अंदाज आहे. दिवसाचं कमाल तापमान 37 अंश तर किमान तापमान 29 अंश राहण्याचा अंदाज आहे. तसेच या दिवशी ताशी 43 किलोमीटर वेगानं वारे वाहतील.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! टी20 विश्वचषकात खेळणारा एकही भारतीय खेळाडू आयपीएलच्या फायनलमध्ये नाही!
फायनलमध्ये कोलकाताशी भिडणार हैदराबाद, कोणाचं पारडं जड जाणून घ्या हेड टू हेड रेकाॅर्ड