क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन प्रीमियर लीगचा 17वा हंगाम देशातच खेळला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बीसीसीआयनं यापूर्वी केवळ 7 एप्रिलपर्यंतच सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. आता उर्वरित सामन्यांचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे.
क्रिकेट वेबसाइट क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आयपीएल 2024 चे सर्व सामने देशातच खेळवले जातील. लीगचा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नई येथे होणार आहे. क्वालिफायर सामने अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये खेळवले जातील. या हंगामातील सर्व 74 सामने भारतात होणार आहेत.
आयपीएल 2024 चे क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामने 21 आणि 22 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळले जातील. तर क्वालिफायर 2 आणि अंतिम सामना चेपॉक, चेन्नई येथे 24 आणि 26 मे रोजी खेळला जाईल.
दुसऱ्या टप्प्याच्या वेळापत्रकानुसार, पुढील सामने 8 एप्रिलपासून खेळले जातील. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 8 एप्रिल रोजी सामना होणार आहे. हा सामना चेन्नईत खेळला जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की आयपीएलचे सामने भारतातच खेळले जातील.
पहिला प्लेऑफ सामना 21 मे रोजी होणार आहे, जो नंबर-1 आणि नंबर-2 संघांमध्ये होईल. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. यानंतर एलिमिनेटर सामना होईल, ज्यामध्ये नंबर-3 आणि नंबर-4 संघ एकमेकांसमोर असतील. हा सामनाही फक्त नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. पहिला क्वालिफायर जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल, पराभूत संघाला अंतिम फेरीत प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळेल. एलिमिनेटर सामना हरणारा संघ आयपीएलमधून बाहेर पडेल, विजयी संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाशी सामना करेल. दुसरा क्वालिफायर सामना 24 मे रोजी एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळवला जाईल. यानंतर 26 मे रोजी चेन्नईमध्ये अंतिम सामना होणार आहे.
वेळापत्रकानुसार, पंजाब किंग्जचं दुसरं होम ग्राउंड असलेल्या धर्मशाला येथे दोन सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या ठिकाणी पंजाब 5 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध, आणि 9 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सामना खेळेल. याशिवाय राजस्थान रॉयल्सचं दुसरं होम ग्राउंड असलेल्या गुवाहाटीमध्येही दोन सामने होणार आहेत. राजस्थान गुवाहाटीत 15 मे रोजी पंजाब किंग्ज आणि 19 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळतील.
महत्त्वाच्या बातम्या-
हिटमॅनकडून सर्वांना ‘हॅप्पी होळी!’, पाहा रोहित शर्माचा रंगांसोबत खेळतानाचा व्हिडिओ
फिक्सिंगमध्ये दोषी मोहम्मद आमिर टी20 विश्वचषक खेळणार? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे