आयपीएल 2024 च्या 59व्या सामन्यात आज गुजरात टायटन्स समोर पाच वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरातनं 20 षटकांत 3 गडी गमावून 231 धावा केल्या. आता चेन्नईसमोर विजयासाठी 232 धावांचं लक्ष्य आहे.
चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं नाणेफेक जिंकल्यानंतर गुजरातला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. गुजरातच्या सलामीवीरांनी हे आमंत्रण दोन्ही हातांनी स्वीकारलं. गुजरातकडून आज कर्णधार शुबमन गिलसोबत साई सुदर्शन सलामीला आला. या दोघांनी चेन्नईची गोलंदाजी फोडून काढली.
साई सुदर्शननं त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलं शतक ठोकलं. तो 51 चेंडूत 103 धावा करून बाद झाला. आपल्या या खेळीत त्यानं 5 चौकार आणि 7 षटकार लगावले. तुषार देशपांडेनं त्याला शिवम दुबेच्या हाती झेलबाद केलं. साई सुदर्शनला कर्णधार शुबमन गिलनं उत्तम साथ दिली. त्यानंही आपल्या आयपीएल कारकिर्दीतील चौथं शतक ठोकलं. तो 55 चेंडूत 104 धावा करून बाद झाला. तुषार देशपांडेच्या गोलंदाजीत जडेजानं त्याचा झेल घेतला. शुबमननं 9 चौकार आणि 6 षटकार हाणले.
सुदर्शन आणि गिल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी झाली. आयपीएलमधील ही संयुक्त सर्वोच्च सलामी भागीदारी आहे.
आयपीएलमधील सर्वोच्च सलामी भागीदारी
210 – शुबमन गिल-साई सुदर्शन, विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 2024
210 – केएल राहुल-क्विंटन डी कॉक, विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 2022
185 – डेव्हिड वॉर्नर-जॉनी बेअरस्टो, विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 2019
184 – गौतम गंभीर-ख्रिस लिन विरुद्ध गुजरात लॉयन्स, 2017
या सामन्यात साई सुदर्शननं आयपीएलमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठला. हा टप्पा गाठणारा तो सर्वात वेगवान भारतीय खेळाडू आहे. साई सुदर्शननं अवघ्या 25 डावांत ही कामगिरी केली. त्याच्या आधी हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकर आणि ऋतुराज गायकवाडच्या नावे होता, ज्यांनी 31 डावांमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या.
आयपीएलमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारे भारतीय
साई सुदर्शन – 25 डाव
सचिन तेंडुलकर/ऋतुराज गायकवाड – 31 डाव
तिलक वर्मा – 33 डाव
सुरेश रैना/ यशस्वी जयस्वाल – 34 डाव
रिषभ पंत/ देवदत्त पडिक्कल – 35 डाव
गौतम गंभीर – 36 डाव
रोहित शर्मा/ महेंद्रसिंह धोनी/ अजिंक्य रहाणे – 37 डाव
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
गुजरात टायटन्स – मॅथ्थू वेड (यष्टिरक्षक), शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी
इम्पॅक्ट प्लेअर्स – संदीप वारियर, शरथ बीआर, दर्शन नळकांडे, अभिनव मनोहर, जयंत यादव
चेन्नई सुपर किंग्ज – रचिन रविंद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टिरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे
इम्पॅक्ट प्लेअर्स – समीर रिझवी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मुकेश चौधरी, अरावेल्ली अवनिश
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित-हार्दिकचा खराब फॉर्म, रिषभ पंतची दुखापत; विश्वचषकात भारतीय संघाचं काय होणार?
अखेर ऋतुराज गायकवाडनं जिंकला टॉस, गुजरातला फलंदाजीचं आमंत्रण; जाणून घ्या प्लेइंग 11