आयपीएल 2024 च्या 60 व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्ससमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान होतं. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. केकेआरनं मुंबईवर 18 धावांनी विजय मिळवला आहे. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे हा सामना 16-16 षटकांचाच करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना कोलकातानं 7 गडी गमावून 157 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सची टीम 8 गडी गमावून 139 धावाच करू शकली.
हर्षित राणा कोलकाताच्या विजयाचा हिरो ठरला. त्यानं अखेरच्या षटकात नमन धीर (17) आणि तिलक वर्मा (32) यांची विकेट घेऊन सामना केकेआरच्या दिशेनं झुकवला. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसलनंही 2-2 विकेट घेतल्या.
धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली होती. सलामीवीर ईशान किशन आणि रोहित शर्मा यांनी 42 चेंडूत 64 धावांची भागीदारी केली. मात्र किशन 40 धावा करून बाद झाला. त्यापाठोपाठ रोहित 19 च्या स्कोरवर पॅव्हेलियनमध्ये परतला. येथून मुंबईची मधली फळी ढेपाळली. सूर्यकुमार (11), हार्दिक पांड्या (2) आणि टिम डेव्हिड (0) झटपट तंबूत परतले. नेहाल वढेरा 3 धावा करून धावबाद झाला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरनं सर्वाधिक धावा केल्या. तो 21 चेंडूत 42 धावा करून बाद झाला. आपल्या या खेळीत त्यानं 6 चौकार आणि 2 षटकार लगावले. नितीश राणानं 23 चेंडूत 33 धावांचं योगदान दिलं. अखेरच्या षटकांमध्ये आंद्रे रसेल (14 चेंडू 24 धावा), रिंकू सिंह (12 चेंडू 20 धावा) आणि रमनदीप सिंग (8 चेंडू 17 धावा) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर केकेआरनं 157 धावांची मजल मारली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि पीयूष चावलानं प्रत्येकी 2-2 बळी घेतले.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स – ईशान किशन (यष्टिरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहाल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
इम्पॅक्ट प्लेअर्स – रोहित शर्मा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, मोहम्मद नबी, कुमार कार्तिकेय
कोलकाता नाईट रायडर्स – फिलि सॉल्ट (यष्टिरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
इम्पॅक्ट प्लेअर्स – अनुकुल रॉय, वैभव अरोरा, सुयश शर्मा, रहमानउल्ला गुरबाज, अंगक्रिश रघुवंशी
महत्त्वाच्या बातम्या –
बुमराहच्या आऊट स्विंग होणाऱ्या चेंडूनं अचानक वाट बदलली! सुनील नारायण चारी मुंड्या चित! पाहा VIDEO
ईडन गार्डनवर हार्दिक पांड्यानं जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजी करणार; पावसामुळे 16-16 षटकांचा असेल सामना
रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी, आता ‘हा’ अष्टपैलू खेळाडू करणार दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व