इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 ला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएलच्या आगामी हंगामात स्टार क्रिकेटर ऋषभ पंत खेळताना दिसेल. बीसीसीआयनं नुकत्याच जारी केलेल्या वैद्यकीय अहवालात या यष्टीरक्षक फलंदाजाला तंदुरुस्त घोषित करण्यात आलं. पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे.
30 डिसेंबर 2022 रोजी उत्तराखंडच्या रुरकीजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर ऋषभ पंत क्रिकेटपासून दूर होता. पंतला तंदुरुस्त होण्यासाठी जवळपास दोन वर्ष लागतील असं वाटत होतं. त्यामुळे तो आयपीएल 2024 मध्ये भाग घेऊ शकणार नाही, असंही बोललं जात होतं. परंतु पंत 14 महिन्यांतच पूर्णपणे बरा झाला. नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) च्या डॉक्टरांनी ऋषभ पंत वेळेपूर्वी कसा फिट झाला, याची संपूर्ण कहाणी सांगितली आहे.
एनसीएमधील फिजिओथेरपिस्ट तुलसी युवराज यांनी बीसीसीआयला सांगितलं की, “मानसिक ताकद आणि आत्मविश्वासामुळे ऋषभ पंतनं आम्हाला पुनर्वसन करताना 100 टक्के देण्याची प्रेरणा दिली. त्याला बरं व्हायला दोन वर्ष लागतील असं डॉक्टरांना वाटत होतं. मात्र एनसीएमध्ये आल्यावर तो झपाट्यानं बरा होऊ लागला.”
एनसीए मधील स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच निशांत बोरदोलोई यांनी सांगितलं की, “ऋषभ पंत त्याच्या बालपणात एक जिम्नॅस्ट देखील होता. त्यामुळे त्याला बरं होण्यास मदत झाली. ऋषभच्या जिम्नॅस्टिकच्या पार्श्वभूमीमुळे आम्हाला खूप मदत झाली. याचा अनेक गोष्टींमध्ये उपयोग झाला. पुनर्वसन खूपच कंटाळवाणं आहे. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करावी लागते. पण ते करण्याशिवाय पर्याय नसतो. तुम्ही जितके जास्त कराल तितक्या लवकर तुम्ही बरे व्हाल.”
ऋषभ पंतनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 98 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं 2838 धावा केल्या आहेत. याशिवाय पंतनं भारतासाठी 33 कसोटीत 2271 धावा केल्या आहेत. त्याच्या नावे 30 एकदिवसीय सामन्यांमध्ये 865 धावा आहेत. ऋषभ पंतनं टीम इंडियासाठी 66 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 987 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूला महिला वसतिगृहात जाताना पकडलं, ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंग
हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स सोडल्यानंतर प्रशिक्षक आशिष नेहराची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…
WPL 2024 Final : आरसीबी इतिहास रचणार की दिल्लीचे स्वप्न भंगणार? घ्या जाणून आकडेवारी आणि प्लेइंग 11