आयपीएल 2024 च्या 69व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं पंजाब किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी (19 मे) झालेल्या या सामन्यात पंजाबनं यजमान संघाला विजयासाठी 215 धावांचं लक्ष्य दिलं होतं, जे त्यांनी अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पूर्ण केलं.
या विजयासह सनरायझर्स हैदराबादनं गुणतालिकेत दुसरं स्थान गाठलं. राजस्थान रॉयल्सनं कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना गमावला किंवा सामना रद्द झाला, तर सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्या क्रमांकावरच राहील. अशा स्थितीत सनरायझर्स कोलकाता विरुद्ध क्वालिफायर 1 सामना खेळेल.
सनरायझर्स हैदराबादच्या विजयात अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अभिषेक शर्मानं 28 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं 66 धावांची खेळी केली. तर हेनरिक क्लासेननं 26 चेंडूंचा सामना करत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 42 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादसाठी राहुल त्रिपाठी (33) आणि नितीश रेड्डी (37) यांनीही उपयुक्त योगदान दिलं. पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेलनं 2-2 विकेट घेतल्या. पंजाब किंग्जचा चालू मोसमातील हा नववा पराभव असून गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर राहिले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जनं 5 गडी गमावत 214 धावा केल्या. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगनं सर्वाधिक 71 धावा केल्या. प्रभासिमरननं 45 चेंडूंचा सामना केला आणि 7 चौकारांशिवाय 4 षटकार ठोकले. अथर्व तायडेनं 27 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 46 धावांची तुफानी खेळी केली. अथर्व आणि प्रभासिमरन यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. रिली रॉसोनं 49 (24 चेंडू, 3 चौकार आणि 2 षटकार) आणि कर्णधार जितेश शर्मानं नाबाद 32 धावांचं (15 चेंडू, 2 चौकार आणि 2 षटकार) योगदान दिलं. हैदराबादकडून टी नटराजननं 2 विकेट घेतल्या.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
पंजाब किंग्ज – प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (कर्णधार/यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, शिवम सिंग, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, हर्षल पटेल, राहुल चहर
इम्पॅक्ट प्लेअर्स – अर्शदीप सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, विद्वथ कवेरप्पा, हरप्रीत सिंग भाटिया
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – ट्रॅव्हिस हेड, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट
महत्त्वाच्या बातम्या –
आधी सलग 6 पराभव…मग सलग 6 विजय! आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कमबॅकचे हे आहेत 5 शिल्पकार
बीसीसीआयची 30 खेळाडूंवर करडी नजर, अय्यर-किशनबाबतही मोठा खुलासा; टीम इंडियात पुन्हा एंट्री मिळेल का?