आयपीएल हे असं व्यासपीठ आहे, जिथे अनकॅप्ड खेळाडूही रातोरात स्टार बनतात. शनिवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज हर्षित राणासोबत असंच काहीसं घडलं. एकीकडे 24.75 कोटींचा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क इडन गार्डन्सवर जोरदार मार खात होता, तर दुसरीकडे हर्षित राणानं अखेरच्या षटकात 13 धावांचा बचाव करत सनरायजर्स हैदराबादच्या तोंडून विजयाचा घास हिसकावून घेतला.
शेवटच्या षटकात हर्षितनं स्वत:वर नियंत्रण ठेवत हेनरिक क्लासेनसारख्या स्फोटक फलंदाजाविरुद्ध टिच्चून गोलंदाजी केली. यानंतर सर्वजण हर्षितचं कौतुक करत आहेत. आता तर खुद्द क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनंही हर्षितची तोंडभरून स्तुती केली आहे.
सचिन तेंडुलकरनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं, “क्लासेननं शेवटच्या षटकापर्यंत हैदराबादचा विजय सुनिश्चित केला होता. परंतु अखेरच्या षटकात हर्षितनं धाडसी गोलंदाजी केली. त्यानं क्लासेनला यॉर्कर्सऐवजी कमी वेगाचा चेंडू टाकण्याचा पर्याय निवडला, जे क्लासेनसाठी अनपेक्षित होतं. फारच चांगली गोलंदाजी!”
22 वर्षीय हर्षित राणा दिल्लीचा रहिवासी आहे. तो दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. आतापर्यंत त्यानं 7 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 28 बळी घेतले आहेत. याशिवाय 14 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याच्या नावे 22 आणि 13 टी-20 सामन्यात 12 विकेट आहेत. केकेआरमध्ये सामील होण्यापूर्वी, हर्षित IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्ससाठी नेट बॉलर होता. रसिक सलाम जखमी झाल्यानंतर हर्षितची केकेआर संघात निवड झाली.
हर्षित राणानं केकेआरच्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं की, “नितीश (राणा) भैय्यानं मला अभिषेक नायर सरांकडे पाठवल्यानंतर मी पहिल्यांदा केकेआरमध्ये आलो. चाचणीच्या पहिल्याच दिवशी नायर सरांनी मला सांगितलं की मी कोलकात्याकडून खेळू शकतो. मी गुजरात टायटन्ससोबत नेट बॉलर होतो. एके दिवशी मला नायर सरांचा फोन आला. रात्री जेव्हा त्यांनी मला कॉन्ट्रॅक्ट पाठवला तेव्हा माझ्या काय भावना होत्या त्या मी व्यक्त करू शकत नाही. मी U19 आणि U25 व्यतिरिक्त देशांतर्गत क्रिकेट खेळलेलो नाही.”
हर्षित राणानं 2022 मध्ये केकेआरसाठी आयपीएल पदार्पण केलं. स्पर्धेतील पहिल्याच चेंडूवर त्याचं चौकारानं स्वागत करण्यात आलं. मात्र, दोन चेंडूंनंतर त्यानं एक विकेटही घेतली. त्या मोसमात त्याची ही पहिली आणि शेवटची विकेट होती. यानंतर 2023 मध्ये त्यानं 6 सामन्यात 5 विकेट घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
हर्षित राणाला मैदानावरील वर्तन भोवलं, मॅच रेफरीनं ठोठावला मोठा दंड
शाहरुख खान पुन्हा वादात! आयपीएल सामन्यादरम्यान उघडपणे केलं धुम्रपान
नरेंद्र मोदी स्टेडियम नाही तर ‘या’ मैदानावर होऊ शकतो IPL 2024 चा अंतिम सामना; लवकरच घोषणा