आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचं वर्चस्व पाहायला मिळालं. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली रिषभ पंतवर लागली. त्याला तब्बल 27 कोटी रुपये मिळाले. श्रेयस अय्यरला 26.75 कोटी आणि व्यंकटेश अय्यरला 23.75 कोटी मिळाले. मात्र भारतीय खेळाडूंनंतर कोणत्या देशाच्या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागली हे तुम्हाला माहीत आहे का? भारतानंतर कोणत्या देशाच्या खेळाडूंनी लिलावात सर्वाधिक पैसे घेतले? जर तुम्हाला माहित नसेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
सौदी अरेबियातील जेद्दाह येथे दोन दिवसीय आयपीएल लिलावात एकूण 182 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. यातील 120 खेळाडू भारताचे होते. उर्वरित 62 खेळाडू विदेशी होते. विदेशी खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंवर सर्वाधिक बोली लावण्यात आली. सर्व आयपीएल फ्रँचायझींनी दक्षिण आफ्रिकेच्या 14 खेळाडूंना खरेदी केलं. ऑस्ट्रेलियाच्या 13 आणि इंग्लंडच्या 12 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. न्यूझीलंडच्या 7 तर अफगाणिस्तान आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी 6 खेळाडूंवर बोली लावली गेली.
एक काळ असा होता, जेव्हा आयपीएलमध्ये वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचा भरणा असायचा. यावेळी मात्र त्यांच्या केवळ 4 खेळाडूंवर बोली लागली. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, सुनील नारायण, निकोलस पूरन आणि आंद्रे रसेल सारख्या वेस्ट वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूंना त्यांच्या संघांनी रिटेन केलं आहे.
लिलावात खेळाडूंच्या संख्येत दक्षिण आफ्रिका जरी पुढे असली तरी पैशाच्या बाबतीत ते ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या मागे आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या 14 खेळाडूंवर एकूण 47.5 कोटी रुपयांची बोली लावली गेली, तर इंग्लंडच्या केवळ 12 खेळाडूंनी 70.25 कोटी रुपये घेतले. 13 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर एकूण 66.7 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे, लिलावात बांगलादेशचा एकही खेळाडू विकल्या गेला नाही. शाकिब अल हसन आणि मुस्तफिजूर रहमान सारखे अनुभवी खेळाडू अनसोल्ड राहिले.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या प्रत्येकी तीन खेळाडूंवर 10 कोटी रुपयांहून अधिक बोली लावण्यात आली. लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा विदेशी खेळाडू इंग्लंडचा जोस बटलर ठरला. जोस बटलरसाठी गुजरात टायटन्सनं 15.75 कोटींची बोली लावली. कागिसो रबाडा या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूवर 10 कोटींहून अधिकची बोली लागली. गुजरात टायटन्सनं त्याला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केलं.
हेही वाचा –
सचिन-सेहवागशी तुलना झालेला पृथ्वी शॉ लिलावात अनसोल्ड का राहिला? कारण जाणून घ्या
भारतीय संघाला मोठा धक्का! महत्त्वाचा फलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर होण्याची शक्यता
ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या बजरंग पुनियावर 4 वर्षांची बंदी, कारण धक्कादायक!






