मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये शामिल झाला आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात मुंबईनं त्याला त्याची बेस प्राईज 30 लाख रुपयांत खरेदी केलं. अर्जुन सुरुवातीला अनसोल्ड राहिला होता. अखेर मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी त्याच्यावर बोली लावली. अपेक्षेप्रमाणे इतर कोणत्याही संघानं त्याच्यात रस दाखवला नाही.
मुंबई इंडियन्सनं अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली, तेव्हा संघाचे मालक नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. त्यांनी टाळ्या वाजवून अर्जुनचं स्वागत केलं. अंबानी कुटुंबियांचं तेंडुलकर कुटुंबियांशी असलेलं नातं हे यामागचं कारण आहे. सचिन तेंडुलकर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळला आहे. तर अर्जुननं अंबानींच्या शाळेत शिक्षण घेतलं आहे. आता तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्यांच्या संघाचा भाग असेल. मुंबईनं त्याला 2021 मध्ये देखील 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीला खरेदी केलं होतं.
वेगवान गोलंदाज अर्जुनला आयपीएल 2021 मध्ये पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. परंतु तो 2022 मध्ये 30 लाख रुपयांमध्ये पुन्हा मुंबईत सामील झाला. 2022 मध्येही तो संपूर्ण हंगाम बेंचवर बसला. अखेर त्याला 2023 मध्ये पदार्पणाची संधी मिळाली. 2023 मध्ये त्यानं मुंबईसाठी 4 सामन्यात 3 बळी घेतले होते. 2024 मध्ये त्याला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली फक्त एकच सामना खेळायला मिळाला, ज्यामध्ये त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे आता या हंगामात संघ त्याचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करतो की नाही हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
सचिन तेंडुलकर सध्या मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील आहे. तो संघाचा मार्गदर्शक असून संघातील खेळाडूंना त्याचा भरपूर फायदा होतो. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, सध्या जारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अर्जुननं गोव्याकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे.
हेही वाचा –
काय होतास, काय झालास! मेगा लिलावात पृथ्वी शॉ अनसोल्ड, एकेकाळी सचिनशी व्हायची तुलना!
सीएसकेसाठी मैदान गाजवणारा अजिंक्य रहाणे ‘या’ संघाकडून खेळताना दिसणार!
IPL Mega Auction; मुंबईसाठी मैदान गाजवणारा खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात सामील