टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी लिलावाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. चोप्रा यांच्या मते, दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो. इतकंच नव्हे तर आगामी लिलावात त्याला कोणतीही टीम 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत खरेदी करू शकते असंही त्यांनी सांगितलं.
त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाले, “सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या सर्व खेळाडूंनी स्वतःला 2 कोटी रुपयांच्या ब्रॅकेटमध्ये ठेवलं आहे. यामध्ये केएल राहुल, रिषभ पंत यांसारख्या अनेक भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो. आगामी हंगामासाठी त्याची किंमत सुमारे 25-26 कोटी रुपये असू शकते.”
आकाश चोप्रा यांनी पंतसाठी पैसे खर्च करू शकणाऱ्या दोन संघांची नावंही सांगितली आहेत. आकाश यांच्या म्हणण्यानुसार, आगामी लिलावात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सारखे संघ त्याला आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करू शकतात.
आकाश चोप्रा म्हणाले, “माझ्या मते, दोन संघ आपापसात लढताना दिसत आहेत. एका संघाकडे (पंजाब किंग्स) 110 कोटी रुपये आणि दुसऱ्या संघाकडे (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) 83 कोटी रुपये आहेत. माझ्या मते, जेव्हा ते एकमेकांशी भिडतील तेव्हा खूप पैसा खर्च होणार आहे.
पंतनं अलीकडेच दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडली. तो 2016 पासून संघासोबत होता. तो गेल्या काही हंगामात संघाचं नेतृत्व करत होता. परंतु यावेळी फ्रँचायझी त्याला फक्त यष्टिरक्षक फलंदाज म्हणून रिटेन करू इच्छित होती. फ्रॅच्याईजीला त्याला कर्णधार बनवायचं नव्हतं. यानंतर त्यानं संघ सोडण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा –
“रचिन रवींद्रनं सीएसकेसोबत मिळून भारताविरुद्ध तयारी केली होती”, माजी खेळाडूचा गंभीर आरोप
रिषभ पंतसाठी ऑस्ट्रेलियाचा खास प्लॅन, कर्णधार कमिन्सनं केला मोठा खुलासा
3 संघ जे आयपीएल 2025 मेगा लिलावात जेम्स अँडरसनवर लावू शकतात मोठी बोली